चार दिवसात कुणबी जातींच्या नोंदी तपासा; जिल्हाधिकारी यांचे आदेश

By गणेश हुड | Published: November 7, 2023 06:56 PM2023-11-07T18:56:13+5:302023-11-07T18:56:27+5:30

जिल्हा प्रशासन लागले कामाला

Check records of Kunbi castes in four days; Collector's order | चार दिवसात कुणबी जातींच्या नोंदी तपासा; जिल्हाधिकारी यांचे आदेश

चार दिवसात कुणबी जातींच्या नोंदी तपासा; जिल्हाधिकारी यांचे आदेश

नागपूर : न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीच्या सुचनेप्रमाणे पुढील चार दिवसात कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात नोंदी शोधण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी मंगळवारी बैठकीत याचा आढावा घेतला. प्रशासनाला गतीने कालमर्यादेत राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले.

छत्रपती सभागृहात झालेल्या या बैठकीत महसूल, राज्य उत्पादन शुल्क, तुरुंग प्रशासन, पोलिस विभाग, रेल्वे पोलिस, जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख विभाग, जिल्हा सैनिक विभाग जिल्हा वक्फ अधिकारी, महानगरपालिका , नगरपालिका सैन्य भरती कार्यालय आदी विविध विभागांचे विभाग प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आनलाईन उपस्थित होते.

सर्व अधिकाऱ्यांनी खासरा पत्रक, पाहणी पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे रजिस्टर, मागणी नोंदणी पत्रक, शैक्षणिक अभिलेखे, जन्म मृत्यू नोंदी, करार खत, भाडेचिठ्ठी, मृत्यूपत्र, माजी सैनिकांच्या नोंदी, सेवापुस्तक, सेवा अभिलेख, सैन्य भरतीच्या वेळी घेतलेल्या नोंदी आदींची तपासणी करावी. यासंदर्भातील विभागणी कशापद्धतीने करावी, याचेही मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आले. मराठा – कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये वंशावळी, निजामकालीन पुरावे, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे तपासण्याची मोहीम राज्यभर सुरू आहे. तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा – कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती राज्यभर वाढविण्यात आल्यानंतर ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Check records of Kunbi castes in four days; Collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.