महापालिकांमध्ये कामे अडवून तोडी करणाऱ्याची चेनच
By admin | Published: December 19, 2015 03:02 AM2015-12-19T03:02:48+5:302015-12-19T03:02:48+5:30
राज्यातील महापालिकांमध्ये नियमाने होणारी कामे अडवून तोडी करणाऱ्यांची चेनच असल्याचा हल्लाबोल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.
सगळ्या गँगचं कंबरडं मोडणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही
नागपूर : राज्यातील महापालिकांमध्ये नियमाने होणारी कामे अडवून तोडी करणाऱ्यांची चेनच असल्याचा हल्लाबोल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.अशा सगळ्या गँगचे कंबरडे मोडू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांनी केलेली आत्महत्या सध्या गाजत आहे. या संदर्भात अनिल गोटे आणि अन्य सदस्यांनी आज लक्षवेधी सूचना मांडली होती.
त्यावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, महापालिकांमध्ये विविध प्रकारच्या परवानग्या देताना प्रक्रिया आॅनलाईन करणे, तिचे सुलभीकरण करणे आणि तिच्यातील मानवी हस्तक्षेप कमीतकमी करणारी ई-प्लॅटफॉर्म पद्धत लवकरच अमलात आणली जाईल. मुंबई महापालिकेने तयार केलेल्या अशा पद्धतीचा प्रारंभ आपल्या व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ठाणे शहरात गोल्डन गँगबरोबरच सिल्व्हर गँगही आहे तिचा बंदोबस्त करा, अशी मागणी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्याचा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की केवळ ठाण्यातच नव्हे तर इतरत्र असलेल्या गोल्डन, सिल्व्हरच नव्हते तर कॉपर, स्टील अशा सगळ्याच गँगचा बंदोबस्त केला जाईल.ही कीड कायमची संपविण्यासाठी आपल्याला विरोधी पक्षांचेही सहकार्य हवे आहे. महापालिकेतील परवानग्यांची फाईल नेमकी कुठे अडली, कुणामुळे आणि कशामुळे अडली यावर लक्ष ठेवणारी पारदर्शी पद्धत आणली जाईल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)