चार हजार उर्दू शाळांची उद्यापासून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:57 PM2019-03-15T15:57:16+5:302019-03-15T15:59:32+5:30
राज्यातील चार हजारांवर उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता मुलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानुसार आता अध्यापन होते किंवा नाही, याची पडताळणी केली जाणार आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यातील चार हजारांवर उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता मुलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानुसार आता अध्यापन होते किंवा नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी विद्या प्राधिकरणाने ५५ तज्ज्ञांची चमू सज्ज केली असून ही चमू पुढील पाच दिवस १५ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शाळेत जाऊन झाडाझडती घेणार आहे.
प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत वाचन क्षमता विकसित झाली पाहिजे, यासाठी विद्या प्राधिकरणाने मराठीसह उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी विशेष मोहीम राबविली होती. यात उर्दू माध्यमाच्या ४ हजार १५६ शाळांचा समावेश होता. या शाळांमधील ८ हजार ३१२ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. नव्या प्रकारचे अध्यापन अधिक प्रभावी व्हावे यासाठी राज्यस्तरावर प्रशिक्षक तयार करून त्यांच्याकडे एकेका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती.
आता प्रशिक्षित झालेले शिक्षक योग्य अध्यापन करीत आहेत किंवा नाही, याची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी पहिल्या टप्प्यात १५ जिल्हे निश्चित करण्यात आले असून १६ ते २० मार्च या पाच दिवसात प्रत्यक्ष शाळेत पोहोचून तपासणी केली जाणार आहे.
या जिल्ह्यांमध्ये होणार तपासणी
अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, रायगड, अहमदनगर, लातूर, नाशिक, ठाणे, पालघर, हिंगोली, जालना, मुंबई, धुळे, जळगाव या १५ जिल्ह्यात १६ मार्चपासून तपासणी सुरू होणार आहे. यावेळी तज्ज्ञ सर्वप्रथम शाळाव्यवस्थापन समितीकडून आढावा घेणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग अध्यापनाची पाहणी करणार आहे.