७४ वर्षांनंतर चित्ता भारतात परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:08 AM2021-05-21T04:08:32+5:302021-05-21T04:08:32+5:30

संजय रानडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर – जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी ओळख असलेला चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात ...

Cheetah to return to India after 74 years | ७४ वर्षांनंतर चित्ता भारतात परतणार

७४ वर्षांनंतर चित्ता भारतात परतणार

Next

संजय रानडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – जगातील सर्वात वेगवान प्राणी अशी ओळख असलेला चित्ता तब्बल सात दशकांनंतर भारतात परतणार आहे. १९५२ साली भारतीय सरकारने चित्त्याला नामशेष प्राणी घोषित केले होते. आता दक्षिण अफ्रिकेतून १४ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये आणण्यात येणार आहेत. एनटीसीएने (नॅशनल टायगर कन्सर्व्हेशन ऑथोरिटी) प्रोजेक्ट चित्ताच्या पहिल्या टप्प्यासाठी १४ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. देशाच्या वन्यजीव इतिहासातील हे एक मोठे पाऊल राहणार आहे.

मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) आणि मध्य प्रदेशचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आलोक कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देशात चित्ते परत येत आहेत ही सकारात्मक बाब आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशात होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. एनटीसीएचे वन उपमहानिरीक्षक राजेंद्र गारवाड यांनी प्रोजेक्ट चित्ताच्या पहिल्या वर्षासाठी १४ कोटींचा निधी मंजूर केल्याचे पत्र १७ मे रोजी दिले आहे, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

पहिल्या टप्प्यात जनावरांची आंतरराष्ट्रीय वाहतूक, क्षेत्रीय देखरेख व लॉजिस्टिक, कुंपण, क्षमतावर्धन इत्यादींचा समावेश राहणार आहे. चालू आर्थिक वर्षातील वार्षिक योजना केवळ प्राधान्यक्रमातील बाबींपुरती मर्यादित असेल असेदेखील कुमार यांनी स्पष्ट केले.

दक्षिण अफ्रिकेचे तज्ज्ञ व्हिन्सेंट यांनी २६ एप्रिल २०२१ रोजी कुनो पालपूर नॅशनल पार्कला भेट दिली व संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात १४ प्रौढ जंगली चित्यांना दक्षिण अफ्रिकेतील जंगलांमधून पकडल्या जाईल व त्यांना भारतात पाठविण्यात येईल. नोव्हेंबर २०२१ मध्ये ते कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये पोहोचतील. या चित्त्यांना सुरुवातीला पाच चौरस किलोमीटरच्या भागात ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती आलोक कुमार यांनी दिली.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सुकाणू समितीच्या उपसमितीने मध्य प्रदेशसह झारखंड आणि राजस्थानमध्ये चित्ते आणता येतील का याची चाचपणी केली होती. त्यात कुनो पालपूर नॅशनल पार्क सर्वात योग्य स्थान असल्याचे आढळले. केंद्र शासनाने लुप्तप्राय वन्यजीव ट्रस्ट, मध्यप्रदेश वन विभाग, एनटीसीए आणि भारतीय वन्यजीव संस्था यांना प्रोजेक्ट चित्ताची जबाबदारी दिली आहे.

१९४७ मध्ये झाली होती चित्त्याची अखेरची शिकार

एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात एशियाटिक चित्त्यांचे प्रमाण वाढले होते. भारत व मध्यपूर्वेतील देशांत आढळणाऱ्या प्राण्यांत त्यांचा समावेश होता. मात्र त्यानंतर शिकारीमुळे चित्त्यांचे प्रमाण कमी व्हायला लागले. १९४७ साली कोरिआ येथे महाराज नामानुज प्रताप सिंह देव यांनी देशातील अखेरच्या तीन चित्त्यांची शिकार केली होती.

असा असतो चित्ता

चित्ता हा मूळतः अफ्रिका व मध्य इराणमधील मार्जारकुळातील प्राणी आहे. सर्वात वेगवान प्राणी असलेला चित्ता ८० ते १२८ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असतात. ९३ ते ९८ किलोमीटर प्रतितास या चित्त्याच्या वेगाची वेळ नोंदविण्यात आली आहे. प्रौढ चित्त्यांचे वजन २० ते ६५ किलो दरम्यान असते. चित्त्याचे डोके लहान व गोलाकार असते तर चेहऱ्यावर काळ्या अश्रूंसारखे पट्टे असतात. चित्त्याच्या चार उपप्रजाती शोधण्यात आल्या आहेत. चित्ता व मांजराच्या कुळातील इतर प्राण्यांमधील सर्वात उल्लेखनीय फरक हा असतो की त्यांच्याकडे मागे घेण्यासारखे पंजे असतात. यामुळेच चित्ता वेगाने धावत असतानादेखील जमिनीवर पकड घेऊ शकतो.

Web Title: Cheetah to return to India after 74 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.