चेल्याची गुरुवर कुरघोडी

By admin | Published: May 17, 2015 02:48 AM2015-05-17T02:48:45+5:302015-05-17T02:48:45+5:30

दोन वर्षांपूर्वी पोलिसांवर फायरिंग केल्यामुळे आणि त्यानंतर लखनादोन (मध्यप्रदेश) कारागृहातून पळून गेल्यामुळे सर्वत्र चर्चेत आलेला...

Chelle's guru Kurghadi | चेल्याची गुरुवर कुरघोडी

चेल्याची गुरुवर कुरघोडी

Next

नरेश डोंगरे नागपूर
दोन वर्षांपूर्वी पोलिसांवर फायरिंग केल्यामुळे आणि त्यानंतर लखनादोन (मध्यप्रदेश) कारागृहातून पळून गेल्यामुळे सर्वत्र चर्चेत आलेला खतरनाक गुन्हेगार राजा गौस हा कुख्यात गुन्हेगार सत्तू ऊर्फ सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता याचा गुरु‘भाई‘. राजाने जेल ब्रेकचे प्लॅनिग केले. मात्र, त्यात त्याने सत्तूला सहभागी करून घेतले नाही. मात्र, गुरुभाईच्या मनसुब्यांची चाहूल लागताच चेला सत्तूने ‘जेल ब्रेक‘चा समांतर कट रचला आणि गुरुवर मात करीत या कटाला प्रत्यक्षातही आणले. ३१ मार्चच्या ‘जेल ब्रेक‘चा मास्टर मार्इंड राजा गौस नव्हे तर सत्तू आणि बिशनसिंग उके होता, हे आता उघड झाले आहे.
पोलिसांवर गोळीबार तसेच मध्यप्रदेशातील कारागृहासह अनेक ठिकाणच्या पोलीस कस्टडीतून पळून जाण्यात पटाईत असलेला राजा गौस हा प्रत्यक्षात धावू शकत नाही. त्याच्या एका पायात रॉड आहे. परंतू, त्याची क्रूरता लक्षात घेता कारागृहात त्याला त्याच्या साथीदारांपासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र, तो तेथेही भाईगिरी करायचा. मेव्हण्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला त्याने कारागृहातच बदडले. तेथूनच तो खंडणीही वसूल करायचा. कारागृहातून सुटका होणार नाही, हे लक्षात आल्यामुळे त्याने कारागृहातून पळून जाण्याचा कट रचला. भेटीला येणाऱ्या साथीदाराना त्याने पिस्तूल घेऊन बोलविले. व्हीजिटर रूममधून पिस्तूल हातात येताच तो आतमधून आणि त्याचे साथीदार प्रवेशद्वारावर गोळीबार करून पळून जाणार होते. २८ मार्चला या कटाची अंमलबजावणी होणार होती. मात्र, बरेच प्रयत्न करूनही व्हीजिटर रूममधून त्याच्या हातात पिस्तूल देणे त्याच्या साथीदारांना जमलेच नाही. त्यामुळे त्याचा कट हवेत विरला.
दरम्यान, ‘गुरुभाई‘ च्या मनसुब्याची चाहूल सत्तू गुप्ताला लागली. मोठमोठ्या गुन्ह्यात साथ देऊनही राजा गौस एकटाच पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने आपल्याला सोबत घेण्याचे टाळले, हे लक्षात आल्यामुळे सत्तू अस्वस्थ झाला. त्याने राजा गौसवर कुरघोडी करण्यासाठी बिशनसिंग उकेला विश्वासात घेतले. या दोघांनी ‘जेल ब्रेक‘चा समांतर कट रचला. त्यात शिबू, नेपाली आणि आकाश ठाकूरला सहभागी करून घेतले. त्यानंतर राजाला अंधारात ठेवून हे पाच जण ३१ मार्चच्या पहाटे पळून गेले अन् त्यांनी कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली. बरॅकीतही सत्तूची दहशत
जेल ब्रेक‘चा उलगडा करताना ‘आमच्या या कटाची राजा गौसला कल्पना नव्हती अन् त्याला काही कळू द्यायचे नाही, असे सत्तू आणि बिशनने सर्वांना सांगितले होते. त्यानुसार आम्ही बरॅक मधील अन्य कैद्यांनाही धाक दाखवला होता. गज कापताना अनेकांनी आम्हाला बघितले होते. पळून जातानाही अनेक जण जागे होते. मात्र, सत्तूच्या दहशतीमुळेच कुणी तोंड उघडले नाही. आमचा विरोधही केला नाही‘, असे शिबूने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.

राजा गौसचा थयथयाट
आपल्याला अंधारात ठेवून आपले नंबरकारी (चेले) पळून गेल्यामुळे खतरनाक राजा गौस कमालीचा संतप्त आहे. तो पहिल्या दिवशीपासूनच कारागृहात थयथयाट करीत आहे. ‘उनको छोडूंगा नही‘, असे त्याने अनेकदा कारागृहात वक्तव्य केल्याचीही कैद्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांची कस्टडी संपल्यानंतर कारागृहात राजा आणि त्याच्या नंबरकारीतच संघर्ष होण्याची शक्यता ‘भाई जगतातून ‘वर्तविली जात आहे.

Web Title: Chelle's guru Kurghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.