ठाण्यासमोरच घेतला ‘चेतक’ने पेट
By admin | Published: February 16, 2017 02:21 AM2017-02-16T02:21:38+5:302017-02-16T02:21:38+5:30
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या समोर पोलिसांच्या ‘चेतक’ वाहनाने पेट घेऊन ते आगीत खाक झाले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलिसात खळबळ उडाली आहे.
नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्याच्या समोर पोलिसांच्या ‘चेतक’ वाहनाने पेट घेऊन ते आगीत खाक झाले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. आगीचे नेमके कारण कळले नाही.
इमामवाडा ठाण्याचे चेतन वाहन क्रमांक एम. एच. ३१, डी. झेड-०४९८ चालक नसल्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजता ठाण्यासमोर उभे केले होते. दिवसपाळीत तैनात चालक रात्री ९ वाजता वाहनाला लॉक करून चावी सोपवून निघून गेला. पहाटे ३.४५ वाजताच्या दरम्यान हवालदार दिलीपला चेतक वाहन जळत असल्याचे दिसले. त्याने बाहेर येऊन पाहिले असता आगीचा डोंब दिसला. त्याने त्वरित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तसेच नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन विभागाला सूचना दिली. अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचला. अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. त्यातील वायरलेस सेटही नष्ट झाला. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. जाणकारांच्या मते कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी शॉट सर्किटमुळे आग लागल्याची शंका व्यक्त केली आहे. परंतु शॉट सर्किटमुळे इतकी मोठी आग लागत नसल्याचे बोलल्या जात आहे. इमामवाडा परिसरात गुन्हेगारी अधिक आहे. अशा स्थितीत पोलिसांचे वाहन आपात्कालीन स्थितीत कार्यरत असतात. वाहनांच्या देखभालीसाठी मोटार वाहन विभाग कार्यरत आहे. वेळोवेळी वाहनांची तपासणी करण्यात येते. परंतु इमामवाडा पोलिसांनी यात खोडसाळपणा झाल्याचे अमान्य केले आहे. (प्रतिनिधी)
तर अनर्थ झाला असता
चालकाच्या अभावी वाहन ठाण्यासमोर ठेवण्यात आले होते. चालक असता तर मंगळवारी रात्री हे वाहन गस्त घालण्यासाठी बाहेर काढले असते. गस्त घालत असताना ही घटना घडली असती तर अनर्थ घडला असता.