जनतेत जाऊन जाब विचारणार, छगन भुजबळांचा फडणवीस सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 08:31 PM2018-07-08T20:31:17+5:302018-07-08T20:32:14+5:30
मुख्यमंत्री स्वत:चीच वकिली करताहेत
नागपूर : सिडकोच्या भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे म्हणणे खोडून काढण्यासाठी शक्ती लावली पण खरे उत्तर दिले नाही. मुख्यमंत्र्यांना एकीकडे मंत्र्यांना सांभाळायचे आहे. नगर विकास खातेही जपायचे आहे. विरोधकांनाही तोंड द्यायचे आहे. आरोपांमध्ये तथ्य नाही याची वकिली देखील त्यांनाच करायची आहे. मुख्यमंत्री अशा बहुविध भूमिका समर्थपणे वठवित आहेत, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला.
सिडको प्रकरणात काहीही चुकीचे झाले नाही तर स्थगिती का दिली, असा प्रश्न उपस्थित करीत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी आरोपांना सहमतीच दिली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी, कामगार, व्यापारी, ओबीसी, विद्यार्थी सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. त्यावर सरकारने उत्तर द्यावे. विरोधी पक्षाचे सदस्य अधिवेशनात महत्त्वाचे प्रश्न मांडत आहेत. मात्र, सरकारकडून खरे उत्तर मिळत नाही किंवा त्याला बगल दिली जातेय. विरोधकांना सभागृहात बोलायलाही मर्यादा आणल्या जात आहेत. आपण जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत तर बोलणारच आहोत पण जनतेत जाऊनही सरकारला जाब विचारणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.
विधानभवनात जलयुक्त आवार
मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार ही योजना ग्रामीण भागासाठी घेतली होती. मात्र, ती नागपूरसारख्या शहरी भागातही यशस्वीरीत्या राबविण्यात आल्याचे दिसले. जलयुक्तचा प्रयोग विधान भवनातही यशस्वी होताना दिसला. विधानभवनात जलयुक्त आवारसाठी विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली होती का, असा खोचक प्रश्नही त्यांनी केला.