छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला दिले आत्मनिर्भरतेचे सूत्र; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत
By योगेश पांडे | Updated: April 2, 2025 21:35 IST2025-04-02T21:35:27+5:302025-04-02T21:35:42+5:30
युगंधर शिवराय पुस्तकाचे प्रकाशन

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला दिले आत्मनिर्भरतेचे सूत्र; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व लढाया माहिती आहे. मात्र त्यामागील नियोजन व व्यवस्थापन जगापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. त्यांचे आरमार, किल्ले, लांब पल्ल्याच्या तोफांसाठीचे तंत्रज्ञान यातून त्यांचे प्रशासन कौशल्य दिसून येत होते. विशेष म्हणजे प्रत्येक बाबतीत देश आत्मनिर्भर व्हावा हे सूत्र त्यांनी देशाला दिले. त्यांच्या कल्पना त्यांनी अस्तित्वात आणल्या, मात्र आपण अद्यापही अनेक कल्पना लागू करू शकलेलो नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. दिवंगत शिवचरित्र अभ्यासक व शिवव्याख्याते डॉ.सुमंत दत्ता टेकाडे यांच्या युगंधर शिवराय या पुस्तकाचे त्यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मुंडले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुधोजीराजे भोसले, पुस्तकाचे संपादक डॉ.श्याम माधव धोंड, प्रकाशक सचिन उपाध्याय, दत्ता शिर्के, माधवी सुमंत टेकाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. सिकंदराच्या काळापासून आपल्या देशावर आक्रमणाचा क्रम सुरू झाला व बाहेरून आलेल्या मुघलांनी इस्मामच्या नावावर सर्व उद्धस्त करण्यावरच भर दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे देशातील पारतंत्र्याचे युग बदलले. छत्रपती शिवरायांनी केवळ तत्कालिनच नव्हे तर भविष्यातील भारतालादेखील दिशा दिली. त्यांच्या राज्याभिषेकानंतर अनेकांची सद्दीच संपली, असे सरसंघचालक म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्राबाबतची संकल्पना स्पष्ट होती. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत गेले पाहिजे व त्यासाठी शिवचरित्र किर्तनकार समाजात असणे आवश्यक आहे. किर्तनातून सामाजिक बदल होतात ही भोळी श्रद्धा नाही तर त्यामागे सामाजिक तंत्र आहे याकडेदेखील सरसंघचालकांनी लक्ष वेधले. यावेळी मुधोजीराजे भोसले,डॉ.श्याम धोंड यांनी डॉ.सुमंत टेकाडे यांच्या प्रवासावर भाष्य केले. माणिक ढोले यांनी प्रास्ताविक केले, तर वैशाली उपाध्ये यांनी शिवमहिमा गायन केले. डॉ.सतिश चाफले यांनी संचालन केले तर दत्ता शिर्के यांनी आभार मानले.
संघासाठी हनुमान व छत्रपती शिवरायच मूर्त आदर्श
संघाचे काम तत्वरूप असून व्यक्तीवादाला येथे जागा नाही. जर साकार व मूर्त आदर्श डोळ्यासमोर ठेवायचेच असतील तर संघात दोनच जणांना मानले जाते. त्यात हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज हे दोघेच आहे, असे सरसंघचालकांनी सांगितले.
शिवरायांचे कमीत कमी दोन गुण तरी बाळगा
छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या युगाचे आदर्श पुरूषच आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व वाचताना किंवा ऐकताना त्याचे अनुकरण करण्यावर भर असला पाहिजे. आपण त्यांचे सर्व नाही, पण कमीत कमी दोन गुण तरी अंगी बाळगले पाहिजेत, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.