छूमंतर... चार नोटांच्या झाल्या आठ, नंतर गायब झाले चार लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 11:35 AM2021-08-03T11:35:54+5:302021-08-03T11:38:44+5:30
Nagpur News नोटा दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका चाैकडीने हातचलाखी केली. त्यानंतर फळविक्रेता आणि त्याच्या मित्राचे ४ लाख घेऊन पळ काढला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नोटा दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका चाैकडीने हातचलाखी केली. त्यानंतर फळविक्रेता आणि त्याच्या मित्राचे ४ लाख घेऊन पळ काढला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
लीलाधर मनोहर शाहू आणि प्रफुल्ल डायरे अशी फसगत झालेल्या मित्रांची नावे आहेत. ते शिवनगर पारडी येथे राहतात. शाहूंचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. खैरूल नामक आरोपीसोबत शाहूंची काही दिवसांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर खैरूलच्या तीन साथीदारांसोबत शाहूची भेट झाली. आम्ही एकाच्या दोन नोटा करतो, असे आरोपी खैरूल वय ४० वर्षे, सोबत ओळख झाली. आरोपी खैरूल व त्याचे तीन साथीदार यांनी फिर्यादीला एका नोटेच्या दोन नोट करतो, असे सांगितले.
खरे की खोटे तपासण्यासाठी शाहूंनी खैरूल आणि त्याच्या साथीदारांना आपल्या घरी नेले. तेथे आरोपींनी सांगितल्याप्रमाणे बादलीत गरम पाणी आणले. त्यात एक द्रवपदार्थ टाकला. नंतर चार नोटा टाकल्या. काही वेळाने बादलीतून आठ नोटा निघाल्या. त्यामुळे शाहूंचा आरोपींवर विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी त्यांचे मित्र प्रफुल्ल डायरे यांना हा प्रकार सांगितला. शाहूने तीन लाख आणि डायरेंनी एक लाख जमविले. हे चार लाख रुपये घेऊन शाहूने खैरू आणि साथीदारांना नोटा दुप्पट करण्यासाठी शनिवार, ३१ जुलैला दुपारी ३ वाजता आपल्या घरी बोलविले. आरोपी घरी आल्यानंतर त्यांनी एका मोठ्या डब्यात गरम पाणी मागितले. त्यामध्ये आरोपींनी चार बाटल्यांमधील द्रवपदार्थ टाकला. त्यातच ४ लाख रुपये टाकण्याचा भास निर्माण केला. ते निघून गेल्यानंतर शाहू आणि मित्रांनी पाण्यात हात घातला असता त्यात रक्कम आढळली नाही. आपली रोकड घेऊन आरोपी पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर शाहू आणि डायरेंनी खैरूल तसेच साथीदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ते आढळले नाही. त्यामुळे रविवारी पारडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----