अ‍ॅफकॉन्स, उपकंत्राटदाराविरुद्ध चिडाम कुटुंबाचीही तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 05:49 AM2019-09-02T05:49:47+5:302019-09-02T05:49:51+5:30

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवा; सेलू पोलीस स्टेशनकडे मागणी

The Chidam family also complains against AfCons, a subcontractor | अ‍ॅफकॉन्स, उपकंत्राटदाराविरुद्ध चिडाम कुटुंबाचीही तक्रार

अ‍ॅफकॉन्स, उपकंत्राटदाराविरुद्ध चिडाम कुटुंबाचीही तक्रार

googlenewsNext

मुरूमचोरीचा पर्दाफाश

नागपूर : कोटंबा येथील चिडाम कुटुंबानेही रविवारी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प अधिकारी अनिल कुमार व एम. पी. कन्स्ट्रक्शन्सचे मालक आशिष दप्तरी यांच्याविरुद्ध दीड एकर शेतातील मुरुम चोरून नेल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत शेताचे झालेले नुकसान एक कोटी गैरअर्जदारांनी भरून द्यावे व त्यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चिडाम कुटुंबाने केली आहे.

चिडाम कुटुंबाच्या मालकीचे सहा एकर शेत कोटंबा तहसील सेलू (जि. वर्धा) येथे आहे. त्याची सामायिक मालकी पार्वता शंकर चिडाम (६६), त्यांची दोन मुले सुभाष (४७) व सुनील (४२) आणि मुलगी रेखा चिडाम यांच्याकडे आहे. गेल्या आठवड्यात अ‍ॅफकॉन्स व एम. पी. कन्स्ट्रक्शन्सने यापैकी कुणाचीही परवानगी न घेता चिडाम यांच्या शेतात पोकलेन मशीन व बुलडोझर घालून दीड एकरातून मुरूम खोदून काढला व तो ट्रकद्वारे वाहून नेला.

‘लोकमत’ने ३० आॅगस्टच्या बातमीत या घटनेचा उल्लेख केला होता. दुसऱ्याच दिवशी (३१ आॅगस्टला) अ‍ॅफकॉन्सचे अधिकारी चिडाम यांच्या शेतात पोकलेन, बुलडोझर घेऊन पोहोचले व त्यांनी चिडाम यांच्या खड्डे पडलेल्या शेताची मुरूम भरून दुरुस्ती सुरू केली. खरे तर हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होता. पण त्यामुळे चिडाम यांच्या शेताचे अधिकच नुकसान झाले. लोकमतशी बोलताना सुनील चिडाम यांनी हा सर्व घटनाक्रम सांगितला व कुटुंबातर्फे पोलीस तक्रार सेलू पोलीस स्टेशनला रविवारी दाखल केल्याचे सांगितले. ‘शेत खोदण्यापूर्वी अ‍ॅफकॉन्स अथवा एम.पी. कन्स्ट्रक्शन्सने आमची कुणाचीही परवानगी घेतली नाही व मुरूम टाकण्यावेळीही परवानगी घेतली नाही. एका आदिवासी कुटुंबाला हा छळण्याचा प्रयत्न आहे, म्हणून पोलीस तक्रार केल्याचे सांगितले. अ‍ॅफकॉन्स आणि एम. पी. कन्स्ट्रक्शन्सने एक कोटी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी सेलूचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर करीत आहेत. रविवारीही अ‍ॅफकॉन्सचे मुख्य अधिकारी बी. के. झा यांनी फोन उचलला नाही. या प्रकरणातून एक मोठा प्रश्न उभा झाला आहे, तो म्हणजे जर अ‍ॅफकॉन्स व एम. पी. कन्स्ट्रक्शन्स चिडाम यांचे शेत दुरुस्त करू शकते तर मग कोझी कन्स्ट्रक्शनची १०३ एकर जमीन का दुरुस्त करू शकत नाही.

सरपंचांचा खोटेपणा उघड
च्चोरीच्या मुरुमाची वाहतूक केल्यामुळे कोटंबा गावातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे गावात एसटी येत नाही. १ सप्टेंबरच्या वृत्तात कोटंब्याच्या सरपंच रेणुकाताई कोटंबकर यांनी एसटी सेवा बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सेलूला जाण्यासाठी आॅटोरिक्षांची व्यवस्था केल्याचे म्हटले होते.
च्हे वृत्त वाचल्यानंतर कोटंब्याचे आॅटोरिक्षा चालक चंद्रभान वडगुजी भलावी (वाहन क्र. एम.एच.-३२-बी ७१४२) यांनी लोकमतला फोन करून माहिती दिली की, विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बसमधूनच करावी लागते. आॅटोरिक्षातून करणे बेकायदेशीर आहे. कोटंब्यात एकूण सात आॅटोरिक्षा आहेत. त्यापैकी पाच सेलू ते वर्धा अशा चालतात व दोनच कोटंबा ते सेलू अशा चालतात.
च्कोटंबा ग्रामपंचायतीने कोणतीही आॅटोरिक्षा भाड्याने घेतलेली नाही. बहुतेक विद्यार्थी शाळा बुडू नये म्हणून आॅटोरिक्षात बसतात व आम्हीही सेलूपर्यंत माणुसकी म्हणून त्यांची बेकायदा वाहतूक करतो. कधी कुणी ५-१० रुपये दिले तर घेतो; पण ग्रामपंचायत मात्र काहीच पैसे देत नाही, असे भलावी यांनी सांगितले.
 

Web Title: The Chidam family also complains against AfCons, a subcontractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.