नागपुरात मुख्य अभियंता कार्यालय सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:58 AM2019-03-06T10:58:51+5:302019-03-06T11:00:16+5:30
मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत नागपूरसाठी मुख्य अभियंता कार्यालय नुकतेच शासनाने मंजूर केले असून लवकरच नागपुरात ते सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत नागपूरसाठी मुख्य अभियंता कार्यालय नुकतेच शासनाने मंजूर केले असून लवकरच नागपुरात ते सुरू होणार आहे.
मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेसह विभागीय क्षेत्रीय यंत्रणांची फेररचना करण्यासाठीच्या प्रस्तावास २५ एप्रिल २०१७ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार सदर फेररचना करताना प्रादेशिक स्तरावर नव्याने सहा दक्षता व गुणनियंत्रण पथके निर्माण करण्यात आली. त्यासाठी प्रादेशिक महसूल विभाग स्तरावरील कार्यकारी अभियंत्यांची सहा कार्यालये, प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रण कार्यालयात रूपांतरित करण्यात आली.
पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालय आयुक्तालयात विलीन करण्यात आले. मुख्य अभियंता विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम हे कार्यालय ३१ मार्च २०१७ रोजी मुदत संपल्यामुळे बंद झाले होते. पण क्षेत्रीय स्तरावर कामकाज करताना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता हे कार्यालय पुन्हा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय झाला.
नागपूर येथे हे कार्यालय नव्याने सुरू करण्यात येणार आहे. अप्पर आयुक्त जलसंधारण, मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र, असे या कार्यालयाचे नाव राहणार आहे. या कार्यालयासाठी १७ पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे.
प्रादेशिक महसूल विभागाच्या स्तरावरील ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर येथील जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांची सहा कार्यालये पुन्हा नव्याने पुनर्स्थापित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
पुणे व नागपूर येथील अप्पर आयुक्त जलसंधारण, मृद व जलसंधारण कार्यालये, आयुक्त मृद व जलसंधारण यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करतील. मुख्य अभियंता दक्षता व गुणनियंत्रण कार्यालय औरंगाबाद, प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रण अधिकारी ठाणे, नाशिक व अमरावती ही तीन कार्यालये ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार बंद करण्यात येत आहेत.