सरन्यायाधीश बोबडे यांचा शनिवारी नागपुरात जाहीर सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 11:54 PM2019-12-09T23:54:50+5:302019-12-09T23:58:52+5:30
देशाच्या ४७ व्या सरन्यायाधिशपदी निवड झालेले न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा न्यायव्यवस्थेतील या सर्वोच्च बहुमानाबद्दल हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर आणि सर्व कायदेविषयक सदस्यांच्या वतीने शनिवारी १४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता जाहीर सत्कार केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या ४७ व्या सरन्यायाधिशपदी निवड झालेले न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा न्यायव्यवस्थेतील या सर्वोच्च बहुमानाबद्दल हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर आणि सर्व कायदेविषयक सदस्यांच्या वतीने शनिवारी १४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता जाहीर सत्कार केला जाणार आहे.
देशाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या हस्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली हा भावपूर्ण सोहळा होणार असल्याची माहिती हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गौरी वेंकटरमन यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सचिव अॅड. प्रफुल्ल खुबाळकर आणि उपाध्यक्ष अॅड. पी. बी. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशपदी निवड झाल्यानंतर न्या. बोबडे यांचा नागपुरात होणारा हा पहिलाच जाहीर सत्कार आहे. न्या. बोबडे यांच्या कार्यकर्तृत्वाशी नागपूरचे ऋणानुबंध जुळलेले असल्याने हा सोहळा भावपूूर्ण आणि हृद्य असेल, अशी भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्या. आर. के. देशपांडे आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. विकास सिरपूरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. या मुख्य पाहुण्यांसह मुंबई उच्च न्यायालयातील अनेक सन्माननिय न्यायाधिशांच्या तसेच औरंगाबाद व गोवा खंडपीठांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या सोबतच कायदेविषयक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनाही या समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
नागपूर हायकोर्टाच्या प्रांगणातील इमारत क्रमांक तीन समोरील मोकळ्या मैदानावर उभालेल्या शामियान्यामध्ये हा समारंभ होऊ घातला आहे. या समारंभाला होणारी मान्यवरांची गर्दी लक्षात घेता वाहनांची पार्किंग व्यवस्था आणि अन्य नियोजन कसे असेल, या संदर्भात प्रशासकीय पातळीवर आखणी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नागपूरकरांच्या दृष्टीने हा सत्कार सोहळा कौतुकाचा असून अभिमान जागविणारा आणि नागपूरचा सन्मान वाढविणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हायकोर्ट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह बारचे सर्व सदस्य या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.