मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या मुख्यालयात दाखल, सरसंघचालकांशी करणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 09:58 PM2019-11-05T21:58:33+5:302019-11-05T22:06:50+5:30
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 13 दिवस उलटले तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही.
नागपूरः विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 13 दिवस उलटले तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. अन्यथा आमच्याकडे पर्याय असल्याचा दावा करून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजपा सत्तावाटपात झुकतं माप देत नसल्यानं शिवसेनाही आक्रमक झाली आहे.
राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. 'देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत आणि संपूर्ण भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत. तसेच राज्यामध्ये येत्या काही काळात भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन होईल,'' असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले असून, ते संघश्रेष्ठींशी या विषयावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे संघाच्या मध्यस्थीनं भाजपा-सेनेमधील सत्तावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे राज्यातील पेचप्रसंग सोडवण्याची विनंती केली आहे. शिवसेनेचे नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सल्लागार असलेल्या किशोर तिवारी यांनी नितीन गडकरी यांना दोन्ही पक्षांमधील तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. तसेच तिवारी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.