मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मिशन इलेक्शन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:59 AM2018-02-04T00:59:42+5:302018-02-04T01:04:43+5:30
मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना एकत्र करीत विकासाची गाडी दामटण्यास सुरुवात केल्याने ही अप्रत्यक्षपणे ‘मिशन इलेक्शन’ ची सुरुवात मानली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवड्यात भंडारा- गोंदियातील लोकप्रतिनिधींची विशेष बैठक घेतल्यानंतर आता शनिवारी त्यांनी ‘रामगिरी’ येथे पूर्व विदर्भातील खासदार, आमदार व नगराध्यक्षांची बैठक घेतली. नगर परिषदांच्या विकासावर लक्ष केंद्रित करीत बैठकीत त्यांनी नगराध्यक्षांना प्रत्यक्ष काम करताना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना एकत्र करीत विकासाची गाडी दामटण्यास सुरुवात केल्याने ही अप्रत्यक्षपणे ‘मिशन इलेक्शन’ ची सुरुवात मानली जात आहे.
रामगिरीवर झालेल्या बैठकीत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह खासदार अशोक नेते, खा. रामदास तडस, आ. अनिल सोले, परिणय फुके, विजय रहांगडाले, आशिष देशमुख, समीर मेघे, सुधीर पारवे, समीर कुणावार, बाळा काशीवार, रामचंद्र अवसरे यांच्यासह नगराध्यक्ष सुनील मेंढे, अशोक इंगळे, प्रेम झाडे, चरणसिंग ठाकूर, आदी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नगर परिषदेचा आढावा घेतला. बहुतांश नगर परिषदेत थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यांना काम करताना कोणत्या अडचणी येत आहेत, प्रशसाकीय सहकार्य किती मिळत आहे, कोणत्या बाबींवर शासनातर्फे सुधारणा करणे अपेक्षित आहे, शासनाकडे कोणत्या फाईल्स प्रलंबित आहेत, कोणत्या विकास कामांसाठी निधीची गरज आहे, आदी बाबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणून घेतल्या. नगराध्यक्षांनी आपापल्या अडचणी मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
कामे करा, संपर्कात रहा
बैठकीत नगराध्यक्ष व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना विकास कामे करा व जनतेच्या संपर्कात रहा, असा सल्ला दिला. नगराध्यक्ष म्हणून सर्व नगरसेवकांना सांभाळणे, त्यांना विश्वासात घेऊन काम करणे, नगरसेवकांनाही जनतेच्या संपर्कात राहण्यास सांगणे आदी जाबबादारी चोखपणे पार पाडा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या अर्थसंकल्पात नगर परिषदांसाठी भरीव तरतूद करण्याची हमीही त्यांनी दिली.