मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाला घातले साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 11:00 PM2017-09-02T23:00:01+5:302017-09-02T23:00:05+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावे, समाजाला दिशा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नागपूर, दि. 2 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावे, समाजाला दिशा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीनगर गणेश मंडळाला भेट दिली. श्री पूजन केले. मंडळातर्फे धातूची मूर्ती स्थापित केली जाते, याचे त्यांनी कौतुक केले. मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके गोळा करून त्या वितरित केल्या जातात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वही-पुस्तक गणरायाच्या चरणी अर्पण करून सर्वांना शिक्षण लाभू दे, अशी प्रार्थना केली. मंडळातर्फे राबविण्यात येणा-या सामाजिक उपक्रमांची त्यांनी प्रशंशा केली. या वेळी महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी उपस्थित होते.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरपीएफ बॅरेक अजनी येथील रेल्वे सुरक्षा बल गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन दर्शन घेतले. यासोबतच पांडे ले-आऊट येथील उत्कर्ष सांस्कृतिक मंडळ, भेंडे ले-आऊट येथील श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, जयताळा एकात्मतानगर व उज्ज्वल सोसायटी येथील नवयुवक गणेश मंडळ, सरस्वती विहार कॉलनी त्रिमूर्तीनगर येथील सरस्वती विहार गणेशोत्सव मंजळ, प्रतापनगर येथील साहस गणेशोत्सव मंडळ, अभ्यंकरनगर सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, कॉर्पोरेशन कॉलनी गणेश उत्सव मंडळ, रामदासपेठ फार्मलॅण्ड गणेश उत्सव मंडळ, इमामवाडी येथील श्री गणेशोत्सव मंडळ, भगवान नगर येथीलल युवा गणेशोत्सव मंडळ, नरेंद्र नगर येथील महागणपती, मनीष नगर येथील पॅन्थॉन नगर आश्रय उत्सव समिती आदी मंडळांना भेट धेऊन गणरायाचे दर्शन घेतले. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व निरोगी व आनंदी जीवनाची मनोकामना केली.
मुख्यमंत्री ‘बिफोर टाईम’
- कामी मंडळांना मुख्यमंत्र्यांनी बिफोर टाईम भेट दिली. मुख्यमंत्री येणार म्हणून कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. प्रत्येक जण तयारीला लागले होते. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ताफा येऊन पोहचला. वेळेपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस पोहचल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांना काय करावे ते सूचेनासे झाले होते.
सेल्फिसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह
- गणेश मंडळांना भेटी दिल्यानंतर मंडळांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांसोोबत सेल्फी काढून घेण्यास आग्रही दिसले. मुख्यमंत्र्यांनीही ब-याच ठिकाणी कार्यकर्त्यांचे मन राखत सेल्फी काढून घेतला.
मुख्यमंत्र्यांवरील विघ्न टळो
- काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉफ्टर अपघातातून बचावले. नागपूरचे पूत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांवर आता कुठलेही विघ्न येऊ देऊ नको, असे साकडे गणेश मंडळांनी गणरायांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घातले.