रेल्वेस्थानकांबाहेरील अवैध दुकाने हटविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:17 AM2017-12-13T00:17:39+5:302017-12-13T00:17:59+5:30
मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकावर सप्टेंबरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच स्थानकांबाहेरील अवैध स्टॉल्स आणि दुकाने हटविण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
नागपूर : मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकावर सप्टेंबरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच स्थानकांबाहेरील अवैध स्टॉल्स आणि दुकाने हटविण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अवैध फेरीवाल्यांना आधीच हटविण्यात आले आहे. मुंबईत एक नवीन स्कायवॉक, १० नवीन फूटओव्हर ब्रिजेस आणि सध्याचे २१ पूल नव्याने बांधण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडून आलेले आहेत. सुरक्षिततेसाठी राज्य पोलिसांच्या मदतीने जादा कुमक ठेवण्यात आली आहे. एल्फिन्स्टन स्टेशनवरील दुर्घटनेसाठी कोणताही अधिकारी जबाबदार नव्हता, असे रेल्वे प्रशासनाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विकासकांनी महापालिकेचे कोट्यवधी रुपये थकविले
नागपूर : मुंबई महापालिकेच्या जागांवर उभ्या राहिलेल्या म्हाडा व एसआरएच्या इमारतींपोटी विकासकांनी महापालिकेकडे अद्यापही प्रिमियमची ३८९ कोटी रुपयांची रक्कम भरलेली नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार व इतरांच्या प्रश्नात त्यांनी सांगितले की, एकूण १२३ विकासकांकडून महाापलिकेला १ हजार २४० कोटी रुपये घ्यायचे होते. आतापर्यंत ४१ प्रकल्प पूर्ण झाले असून अन्य उभारले जात आहेत. विकास नियंत्रण नियमावलीच्या कलम ३३ (७) नुसार प्रिमियमची रक्कम भरावी लागते. विकासकांनी आतापर्यंत त्यापोटी ८४६ कोटी रुपये भरले आहेत पण ३९३ कोटी रुपये भरणे बाकी आहेत. अशी थकबाकी असलेल्या विकासकांना बांधकाम थांबविण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत.
४६ अधिका-यांची चौकशी
नागपूर : मुंबईतील म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या विविध बांधकामांचे बनावट चाचणी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी २० कंत्राटदार आणि १७ मजूर सहकारी संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून म्हाडाच्या ४६ अधिकाºयांची चौकशी केली जात असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बाबतचा प्रश्न विचारला होता.
अॅसिडने झाडे पाडणा-या विकासकांविरुद्ध गुन्हे
मुंबई : चेंबूर; मुंबई येथे अॅसिडचा वापर करून झाडे पाडणा-या दोन विकासकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, करिष्मा डेव्हलपर आणि वीणा डेव्हलपर यांच्या विरुद्ध गेल्या नोव्हेंबरमध्ये तक्रारी आलेल्या होत्या. वृक्षसंवर्धन व संरक्षण कायद्यांतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.