मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला रवाना; पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 05:39 PM2022-07-11T17:39:30+5:302022-07-11T17:41:19+5:30
मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे.
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले.
नागपूर विमानतळावर विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर ,पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांनी त्यांना विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला. त्यानंतर खराब हवामानामुळे हेलिकॅप्टर ऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले.
दरम्यान, दरम्यान, हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, सर्व प्रकारची दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले आहेत.