मुख्यमंत्री फडणवीस यांना यंदाचा नागभूषण अवॉर्ड
By admin | Published: August 7, 2016 02:07 AM2016-08-07T02:07:14+5:302016-08-07T02:07:14+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नागपूरला पहिल्यांदा राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नागपूरला पहिल्यांदा राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपल्या कर्तृत्वाने एक प्रभावी, स्वच्छ व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. ते राज्याला विकासाच्या योग्य दिशेने नेत आहेत. त्यांच्या याच कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन नागभूषण फाऊंडेशनतर्फे यंदाचा नागभूषण अवॉर्ड मुख्यमंत्री फडणवीस यांना जाहीर झाला आहे. नागभूषण फाऊंडेशनतर्फे राष्ट्रभाषा संकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज ही घोषणा करण्यात आली. या पत्रपरिषदेत नागभूषण फाऊंडेशनचे सचिव गिरीश गांधी यांनी सांगितले की निवड समितीने एकमताने या पुरस्कारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाला मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प, आयआयएम या सारखे प्रकल्प राबवले जात आहेत. यामुळे नागपूर व विदर्भाच्या विकासाला गती मिळत आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना या पुरस्कारने सन्मानित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हिवाळी अधिवेशन काळात एक तारीख निश्चित करून पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित केला जाईल, असेही गिरीश गांधी यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, सदस्य डी. आर. मल उपस्थित होते. (प्रतिनिधी)