मुख्यमंत्री-फडणवीस एकाच मंचावर येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:46 PM2019-12-17T23:46:10+5:302019-12-17T23:47:33+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे १९ डिसेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे १९ डिसेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील निमंत्रित करण्यात आले असून दोघेही उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या हस्तेच या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकारण तापले असताना एकाच मंचावर आल्यावर हे दोघे नेते काय भाष्य करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘कॅम्पस’जवळील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ सप्टेंबर २०१५ रोजी याचे भूमिपूजन पार पडले. या वर्षी सप्टेंबर महिन्यात काम जवळपास पूर्ण झाले. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येथे प्रशासकीय कार्यालय स्थानांतरित करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र सरकार स्थापना न झाल्याने उद्घाटन रखडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री किंवा मोठ्या मंत्र्याला आमंत्रित करण्याचा विद्यापीठाचा मानस होता. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यपाल नागपुरात राहणार आहेत. त्या अनुषंगाने १९ डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते व्हावे असा दानदाते राहुल बजाज यांचा आग्रह होता. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील निमंत्रण पाठविण्यात आले. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा करण्यात आली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले असून दोघांनीही येण्याचे कबूल केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत, बजाज इलेक्ट्रीकल्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.