मूलच्या कर्मभूमीला मिळाला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

By Admin | Published: October 30, 2014 12:44 AM2014-10-30T00:44:21+5:302014-10-30T00:44:21+5:30

१९६२ नंतर तब्बल ५२ वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या कर्मभूमीला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री लाभत आहे. २१ नोव्हेंबर १९६२ रोजी कर्मवीर मा.सा. उपाख्य कर्मवीर कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री

Chief Minister gets second time for Chief Minister | मूलच्या कर्मभूमीला मिळाला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

मूलच्या कर्मभूमीला मिळाला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

googlenewsNext

कन्नमवारांच्या आठवणी ताज्या : देवेंद्र फडणवीसही मूलचेच
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
१९६२ नंतर तब्बल ५२ वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या कर्मभूमीला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री लाभत आहे. २१ नोव्हेंबर १९६२ रोजी कर्मवीर मा.सा. उपाख्य कर्मवीर कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आता ३१ आॅक्टोबरला महाराष्ट्राचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्रवासाने भारावलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूलवासीयांच्या भावना मात्र या प्रसंगामुळे उचंबळून आल्या आहेत.
सर्वसामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री अशी ‘बॉटम टू टॉप’ प्रवासगाथा असलेल्या या दोन्ही व्यक्तिमत्वांमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह मूल तालुक्यातील जनतेला प्रचंड आनंद झाला आहे. कर्मवीर कन्नमवार यांचे चंद्रपुरातील भानापेठ वार्डात घर होते. चंद्रपुरातच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरूवात झाली. १९३१ मध्ये त्यांनी चंद्रपुरात गांधी सेवा मंडळाची स्थापना केली. या मंडळाचे ते प्रमुख होते. इंग्रज पारतंत्र्याच्या काळात त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झाली.
मूल-सावली विधानसभा मतदार संघातून ते दोनदा विजयी झाले. त्यावेळी हा मतदार संघ आणि चंद्रपूर जिल्हा मध्यप्रदेशात होता. १९५२ मध्ये ते पहिल्यांदा या मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर मध्यप्रदेश मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. पुढे महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर ते मुख्यमंत्री झाले.
मूल तालुक्यातील मारोडा ही मा. सा. कन्नमवारांची जन्मभूमी मानली जाते. तर, मूल ही मनोनित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी आहे. मूलमधील फडणवीस वाड्यात देवेंद्र यांचे बालपण गेले. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस विधान परिषदेवर निवडून गेले होते.
त्यांच्या निधनानंतर मूलचा राजकीय वारसा त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी चालविला. शिक्षणासाठी देवेंद्र फडणवीस नागपूरला गेल्यावर तिथे संघ परिवाराशी त्यांचा जवळचा संबंध आला. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते महापौर आणि त्यानंतर भाजपा प्रांताध्यक्ष ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास मूलच्या जनतेलाही अचंबित करायला लावणारा आहे.
कर्मवीर कन्नमवारांनंतर देवेंद्र फडणवीस यांचे नाव मूलसोबत जोडले जाणार असल्याने या क्षेत्राच्या विकासाची आस लावून बसलेल्यांच्या आशा पालवल्या आहेत.
दोघांच्याही प्रवासाची पाऊलवाट सारखीच
मा.सा. कन्नमवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही सामाजिक आणि राजकीय प्रवासाची पाऊलवाट सारखीच आहे. स्वप्नवत असलेला या दोघांचाही प्रवास थक्क करायला लावणारा आहे. कर्मवीर कन्नमवार यांनी काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून कामाला सुरूवात केली. चंद्रपुरातील गांधी चौकात एका फळ्यावर बातम्यांचे मजकूर आणि मथळे लिहून जनप्रबोधन केले. तर, देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या रांगेत बसून नागपुरातील संघ कार्यालयातून आयुष्याला दिशा दिली.

Web Title: Chief Minister gets second time for Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.