मुख्यमंत्री नागपुरात, नागपूर हिंसाचाराचा आढावा घेणार
By योगेश पांडे | Updated: March 22, 2025 07:20 IST2025-03-22T07:19:19+5:302025-03-22T07:20:17+5:30
सद्यस्थितीत नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू असून त्यामुळे व्यापाऱी व हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कर्फ्यू हटविण्याची मागणी जोर धरते आहे. या स्थितीत मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री नागपुरात, नागपूर हिंसाचाराचा आढावा घेणार
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुक्रवारी रात्री नागपुरात आगमन झाले. नागपुरात सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच नागपुरात आले असून ते शनिवारी एकूण स्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते पोलिस आयुक्तांसोबत, पोलिस अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून सुरक्षाव्यवस्था तसेच तपासाचा आढावा घेतील. त्याचप्रमाणे शहरातील कर्फ्यूबाबतदेखील त्यांच्या उपस्थितीत निर्णय होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू असून त्यामुळे व्यापाऱी व हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कर्फ्यू हटविण्याची मागणी जोर धरते आहे. या स्थितीत मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाल-हंसापुरीत पसरलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी शहरातील अकरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावला होता. मात्र, गुरुवारी सकाळी पोलिसांनी नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू हटविला, तर सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथिलता दिली होती. मात्र रात्री सक्करदरा, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, इमामवाडा, सक्करदरा व यशोधरानगर येथील शिथिलता रद्द केली. त्यामुळे सद्यस्थितीत नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू कायम आहे. शांतता प्रस्थापित झाल्याने आता तरी संवेदनशील जागा वगळता इतर ठिकाणचा कर्फ्यू उठवावा अशी मागणी समोर येते आहे.