मुख्यमंत्र्यांनी पाळली रक्षाबंधनाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:49 AM2018-08-27T10:49:51+5:302018-08-27T10:51:51+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण आणि आपले वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ होऊ दिलेली नाही. व्यस्त वेळापत्रक असूनदेखील रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीची आवर्जून भेट घेतली व राखी बांधून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी राजकारणात एखादी व्यक्ती उच्च पदावर गेली की नातेवाईकांपासून काहीशी तुटत जाते. ‘प्रोटोकॉल’ आणि व्यस्ततेमुळे जवळच्या व्यक्तींनादेखील इच्छा असूनही भेटणे शक्य होत नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राजकारण आणि आपले वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ होऊ दिलेली नाही. व्यस्त वेळापत्रक असूनदेखील रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीची आवर्जून भेट घेतली व राखी बांधून घेतली. लहानपणापासून सुरू असलेल्या या परंपरेत यंदादेखील कुठेही खंड पडला नाही हे विशेष.
रविवारी मुख्यमंत्री नागपुरात होते व शहरातील विविध विकास प्रकल्पांबाबत नियोजित बैठक होती. शिवाय इतर कार्यक्रमदेखील त्यांच्या वेळापत्रकात होते.
मात्र रक्षाबंधन असल्यामुळे त्यांनी आवर्जून चुलत बहीण भावना खरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे बंधू आशिष फडणवीस हेदेखील होते. बांबूने तयार केलेली राखी यावेळी भावना खरे यांनी मुख्यमंत्र्यांना बांधली.
खरे कुटुंबीयांशी यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनमोकळेपणाने गप्पादेखील मारल्या.
साधेपणा जपणारे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे आमचे बंधू असले तरी ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहे. त्यांची व्यस्तता आम्हाला कळते. मात्र इतक्या घाईगडबडीतदेखील ते नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करतात. इतकेच काय तर फोनदेखील उचलतात. लहानपणापासून सुरू असलेली रक्षाबंधनाची परंपरा त्यांनी अद्यापही जपली आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे मत भावना खरे यांनी व्यक्त केले.