मुख्यमंत्री लागले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 09:33 PM2019-05-25T21:33:46+5:302019-05-25T21:37:51+5:30
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला मिळालेल्या प्रचंड यशाने उत्साहित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. नागपुरातील आपल्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे त्यांनी त्यांचे विधानसभा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या बूथनिहाय मतदानाचा आढावा घेतला. कमजोर असलेले बूथ मजबूत करण्याच्या सूचना करीत पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला मिळालेल्या प्रचंड यशाने उत्साहित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. नागपुरातील आपल्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे त्यांनी त्यांचे विधानसभा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या बूथनिहाय मतदानाचा आढावा घेतला. कमजोर असलेले बूथ मजबूत करण्याच्या सूचना करीत पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत महापौर नंदा जिचकार, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष किशोर वानखेडे यांच्यासह दक्षिण-पश्चिममधील पक्षाचे सर्व पदधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना १ लाख २० हजार १८५ मते मिळाली. काँग्रेसचे नाना पटोले यांना ६५,०६९ मते मिळाली. गडकरी यांना येथून ५५,११६ मतांची आघाडी मिळाली, हे विशेष. वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांना येथून ६०६५ आणि बसपाच्या मो. जमाल यांना ५९६२ मते मिळाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी सकाळी ९ वाजता मतदारसंघातील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यांनी सर्वात अगोदर पदाधिकारी व नगरसेवकांचे अभिनंदन केले. यानंतर प्रत्येक बूथची माहिती घेतली. दलितबहुल भागातील बूथवर पक्षाला कमी मतदान झाल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा सर्व बृथवर जनसंपर्क आणखी वाढवून ते मजबूत करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, नरसेवक राजू हडप, लक्ष्मी यादव, विजय चुटीले, लखन येरावार, मीनाक्षी तेलगोटे आदी उपस्थित होते.
नवीन मतदारांवर अधिक भर
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही बूथवर पक्षाला अपेक्षित मते न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा बूथवरील नवीन मतदारांना जोडण्यावर भर देण्यास सांगितले. पदाधिकारी आणि नगरसेवकांना आपापल्या परिसरातील नवीन मतदारांच्या नोंदणीकडे लक्ष देण्यास सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्या, असेही सांगितले.