मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या दबावात स्वत:चीच प्रभाग रचना बदलली; नितीन राऊत यांनी साधला नेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 07:48 PM2022-08-04T19:48:57+5:302022-08-04T19:49:34+5:30
Nagpur News शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर भाजपच्या दबावाखाली स्वत:चाच निर्णय बदलत आहेत, अशी टीका माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.
नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला होता. आता तेच शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर भाजपच्या दबावाखाली स्वत:चाच निर्णय बदलत आहेत, अशी टीका माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग रचनेत भाजपला आपला पराभव दिसत होता. त्यामुळे शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय बदलण्यात आला, असा आरोपही राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे महत्त्वाचे मंत्री होते. मंत्रिमंडळात प्रभाग रचनेचा मुद्दा आला त्यावेळी आपण तीन व चार सदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केला होता. मात्र, त्यावेळी शिंदे यांनीच महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग रचनेला संमती दिली. आज ते स्वत:चाच निर्णय बदलवित आहेत. हे विलक्षण आहे. तीनच्या प्रभागात पराभव होईल, अशी भाजपला भीती होती. जिंकण्यासाठी ही सर्व धडपड सुरू आहे. त्यामुळे शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे निर्णय करून घेतले जात आहेत. कुठेतरी भाजपच्या दबावात ते काम करीत आहेत.
चार सदस्यीय प्रभाग लोकांना नकोच आहे. यात खऱ्या अर्थाने विकासकामे होत नाहीत. एकमेकांवर कामे ढकलली जातात. जनतेचा फुटबॉल होतो. लोक नगरसेवकांनी करावयाची कामे आमदारांकडे घेऊन जातात. त्यामुळे आमदारांवरील ताण वाढतो, असे राऊत म्हणाले. आता प्रभाग रचना नव्याने करावी लागेल. त्यामुळे निवडणुका लांबतील. २०२१ च्या लोकसंख्येनुसार प्रभागांची संख्या वाढेल. मतदारांची संख्या वाढेल. त्याचे नियोजन कसे करणार, हे सर्व मुद्दे सरकारने स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली.
...तर प्रभागाचीही चार भागांत फाळणी करा
- शिंदे सरकारला चार सदस्यीय प्रभाग करायचे असतील तर प्रत्येक प्रभागाचीही चार भागांत अंतर्गत फाळणी व्हायला हवी. त्यामुळे नगरसेवकांवर कामांची जबाबदारी निश्चित करता येईल. लोकांची गैरसोय होणार नाही, अशी मागणीही राऊत यांनी केली.