मुख्यमंत्र्यांनी एनसीआरबीच्या अहवालानुसार गुन्हेगारीवर बोलावे - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 05:44 PM2017-12-21T17:44:50+5:302017-12-21T17:44:57+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी एनसीआरबीने भ्रष्टाचार, गुन्हेगारीचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर बोलावे, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले.
नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी एनसीआरबीने भ्रष्टाचार, गुन्हेगारीचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर बोलावे, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले.
देशातील सध्या वातावरण पाहता असे आहे की, सरकार विरोधात बोलले की देशद्रोही ठरविले जाते. राज्य सरकारवर आरोप केले तर राज्याला बदनाम करतायत असे सांगितले जाते. आम्ही दिलेले पुरावे खोटे असतील तर आमच्यावर बदनामीचे खटले भरा. आम्हाला कुठल्याही चौकात शिक्षा द्या आम्ही तयार आहोत. मात्र, पुराव्यांची शहानिशा करा, असे धनंजय मुंडे म्हणाले. यापुढे म्हणाले, असंख्य पुरावे देऊनही राज्याचे मुख्यमंत्री मंत्र्यांना क्लिन चीट देतात. ११ कोटी जनतेचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री 11 जनतेची फसवणूक करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार मुक्त करु असे म्हणाले होते. मात्र, सत्तेत आल्यापासून प्रथम क्रमांकाचे भ्रष्टाचार युक्त राज्य केले आहे. तसेच, आम्ही नागपूरला क्राइम वाढल्याची टीका केली. यावर मुख्यमंत्री म्हणातात विरोधक नागपूरला बदनाम करत आहेत. मग आता एनसीआरबीचा अहवाल भ्रष्टाचार, क्राईम वाढल्याचे सांगत आहे. या एनसीआरबीच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी बोलावे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
याचबरोबर, महिलांच्या विनयभंगाबाबतीत राज्य प्रथम क्रमांकावर आहे. असे असताना...मी लाभार्थी हे माझे सरकार, अशी जाहिरात करते. तसेच, बिहारला मागे टाकून महाराष्ट्र पुढे गेला आहे. त्यामुळे आता हे माझे सरकार अशी पुन्हा जाहीरात करणार का? असा सवालही यावेळी धनंजय मुंडे यांनी केला.