रामभाऊ इंगोले यांच्या निवेदनाने मुख्यमंत्री स्तब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:54 AM2019-08-05T10:54:41+5:302019-08-05T10:56:19+5:30
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाची त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असते. कुणी आर्थिक मदतीसाठी तर कुणी अनुदानासाठी त्यांच्यापर्यंत पोहचत असतो. परंतू शनिवारी मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेले एक निवेदन वेगळे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाची त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असते. कुणी आर्थिक मदतीसाठी तर कुणी अनुदानासाठी त्यांच्यापर्यंत पोहचत असतो. परंतू शनिवारी मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेले एक निवेदन वेगळे होते. आयुष्यभर शासनाचे अनुदान किंवा कुठलीही आर्थिक मदत न घेता केवळ जनसहकार्यातून बाणेदारपणे वंचित मुलांसाठी भक्कम आधार निर्माण करणाऱ्या रामभाऊ इंगोले यांचे हे निवेदन होते. विमलाश्रमातील मुले इतरांच्या मदतीवर राहण्यापेक्षा कायमस्वरूपी स्वावलंबी होतील, असे काही उपाय करा असे निवेदन सादर केले. या निवेदनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गहिवरले व थोड्या वेळ स्तब्ध झाले. मी काहीतरी करतो, एवढा विश्वास त्यांनी दिला.
रामभाऊ इंगोले म्हणजे ‘जे का रंजले गांजले...’ ही संतांची उक्ती स्वीकारलेले असामान्य व्यक्तिमत्त्व. समाजाकडून तिरस्कार, अवहेलनेशिवाय काहीच न मिळालेल्या वस्तीतील मुलांना रामभाऊंनी पोटाशी कवटाळले. त्यांना नुसतीच माया दिली नाही तर समाजाचा जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनविण्यासाठी परिश्रम घेतले. यासाठी प्रसंगी त्यांना घरातून विरोध पत्करून घर सोडावे लागले आणि पांढरपेशा समाजाकडून उपेक्षाही सहन करावी लागली. पण त्यांनी कशाचीही पर्वा न करता आपले आयुष्य या मुलांसाठी समर्पित केले. या तिरस्कृत मुलांना परवड सहन करावी लागू नये म्हणून कायमस्वरूपी ‘विमलाश्रम’चा भक्कम आधारवड उभा केला. यासाठी कधी शासनाकडे अनुदान मागितले नाही की कुणाकडे मदतीसाठी पदर पसरला नाही. त्यांच्याकडे संपत्ती होती असे नाही. संत गाडगेबाबाप्रमाणे फाटक्या झोळीच्या या औलियाने केवळ संवेदनशील सहकाऱ्यांनी स्वखुशीने पुढे केलेल्या मदतीच्या आधारावरच हे विश्व उभे केले आहे. गेल्या २५ वर्षापासून ते चालविले आहे.
खरतर आज रामभाऊ आणि त्यांचा विमलाश्रम मोठ्या कठीण परिस्थितीतून जात आहे. सामाजिक काम करता करता त्यांच्या विमलाश्रमावर ८-१० लाख रुपये कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. मुलांच्या रोजच्या आवश्यक गरजा पूर्ण करणेही मुश्किल झाले आहे. दुसरीकडे त्यांनी खाणीतील मजुरांच्या मुलांसाठी उभारलेल्या शाळेतील कर्मचाºयांच्या वेतनाचाही प्रश्न उभा ठाकला आहे. यावेळी त्यांच्या विमलाश्रमासाठी हात पुढे करण्याची नितांत गरज आहे. मात्र तरीही या भावनिक माणसाने मुख्यमंत्र्यांना अनुदान विचारले नाही की मदत मागितली नाही. रामभाऊ आता वयानेही थकले आहेत. त्यामुळे विमलाश्रमाच्या मुलांचे काय होईल, ही चिंता त्यांना सतावत आहे.
मात्र त्यासाठी मदत किंवा अनुदान मागण्यापेक्षा ही मुले स्वावलंबी होतील, त्यांना रोजगार मिळेल अशी काही उपाययोजना करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. काहीतरी आर्थिक स्रोत निर्माण व्हावा, मुलांना कायमस्वरुपी रोजगार मिळेल अशा व्यवसायाबाबतही त्यांनी सुचविले.
सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे निवेदन त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचा विश्वास त्यांना दिला.