मेट्रो रेल्वे-रामझुला वादावर मुख्यमंत्र्यांनी काढावा तोडगा
By admin | Published: January 8, 2016 04:00 AM2016-01-08T04:00:27+5:302016-01-08T04:00:27+5:30
मेट्रो रेल्वे व रामझुला प्रकल्पामधील वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी व्यक्त केली.
हायकोर्टाची अपेक्षा : चार आठवड्यानंतर सुनावणी
नागपूर : मेट्रो रेल्वे व रामझुला प्रकल्पामधील वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी व्यक्त केली. तसेच, याबाबत मुख्यमंत्र्यांना कळवावे असे सहयोगी महाधिवक्ता रोहित देव यांना सांगून प्रकरणावर चार आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रखडत-रखडत पूर्ण होत असलेल्या रामझुल्याचे आकर्षण नागपूरकरांसाठी केव्हाचेच संपले आहे. हा रामझुला आता नागपूरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो रेल्वेच्या मार्गात अडथळा ठरत आहे. निर्धारित आराखड्यानुसार सी. ए. रोडने येणारी मेट्रो रेल्वे रामझुल्यावरून डाव्या बाजूने रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केट गेटकडे वळण घेणार आहे. त्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला रामझुल्याच्या दोन्ही रोडच्या मधोमध पिलर उभे करायचे आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्पोरेशनला असे करू देण्यास नकार देत आहे.(प्रतिनिधी)