नागपूर जिल्ह्यातील गारपीटग्रस्त पिकांसाठी अनुदान देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:01 AM2018-02-23T10:01:19+5:302018-02-23T10:02:12+5:30
नागपूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांसाठीच्या भरपाईच्या अनुदानाचे तात्काळ वाटप करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांसाठीच्या भरपाईच्या अनुदानाचे तात्काळ वाटप करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नागपूर जिल्ह्यातील पीक नुकसानासंदर्भात आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांनी गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांचा आढावा घेतला. त्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई अनुदानाचे वाटप करण्याबाबत संबंधितांना आदेश दिलेत. त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांचे बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. त्याचाही आढावा या बैठकीत घेतला. या संदर्भातली मदतही जाहीर करण्यात आली होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे जे तालुके यातून सुटले होते त्या तालुक्यांतील बोंडअळी ग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील तात्काळ मदत देण्यात यावी यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मदत जाहीर करताना किमान हजार रुपयांपेक्षा कमी मदत मिळणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही त्यांनी सांगितले.
नागपूर भागातील फळबागांवर झालेल्या गारपिटीमुळे दोन बहरांना नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई करताना याचा विचार व्हावा, अशी ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणी केली. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र बोंडअळीने बाधित आहे त्या क्षेत्रात सरसकट भरपाई द्यावी अशी सूचनाही त्यांनी केली. नुकसान भरपाईसाठी तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
या बैठकीला ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपर मुख्य सचिव मदत व पुनर्वसन मेधा गाडगीळ, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, पशू संवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्यासह व्हिीडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी नागपूर सचिन कुर्वे, कृषी सहसंचालक नागपूर आदी उपस्थित होते.