बाल कर्करोग दिन; बाल कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 07:00 AM2023-02-15T07:00:00+5:302023-02-15T07:00:07+5:30
Nagpur News शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विकिरणोपचार व कर्करोगशास्त्र विभागात बाल कर्करोग रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : लहान मुलांचा कर्करोग हा साधारण ९५ टक्के बरा होणारा आहे; परंतु कर्करोगाच्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेल्या चिमुकल्यांसाठी मेडिकलमधील सोयी अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत मेडिकलच्या कर्करोग विभागात ८० रुग्णांची नोंद झाली. यातील ३१ म्हणजे ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूमागे अनेक कारणे असली तरी अपुऱ्या सोयी हेही एक कारण पुढे येत आहे.
वयस्क लोकांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगाच्या केवळ तीन ते चार टक्के आहे. बालपणातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशात १६.२३ टक्के एवढे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विकिरणोपचार व कर्करोगशास्त्र विभागात बाल कर्करोग रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.
-बाल कर्करोगाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड नाही
बाल कर्करोगाच्या रुग्णांसाठी मेडिकलमध्ये स्वतंत्र वॉर्ड नाही. बालरोग विभागात वॉर्ड क्र. ३ मध्ये १२ बेड या रुग्णांसाठी राखीव आहेत. यातील १० बेड नेहमीच फुल्ल असतात, तर दोन बेड हे ‘डे-केअर’साठी वापरले जातात.
-‘कॅनकिड्स’संस्थेशी सामंजस्य करार
जागरुकतेचा अभाव, उशिरा निदान, अपुऱ्या उपचारांच्या सोयी, आवाक्याबाहेरचा खर्च व अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. याचा फायदा रुग्णांना होत असला तरी मृत्यूची संख्या प्रश्न उपस्थित करणारी आहे.
-बालरुग्णांचा कर्करोगावर उपचार करणे हे सरकारचे कर्तव्य
लहान मुलांचा कर्करोग हा ९५ ते ९८ टक्क्यांपर्यंत बरा होणारा आहे. मेडिकलमध्ये प्रस्तावित कॅन्सर हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या कर्करोगाचा स्वतंत्र विभाग अंतर्भूत आहे. बांधकामासाठी ७५ कोटी तर यंत्रासाठी २३ कोटींचा निधीही मंजूर आहे; परंतु बाल रुग्णांचा कर्करोगावर उपचार करणे हे सरकारचे कर्तव्य असताना हा प्रकल्प कागदावरच आहे. दरम्यानच्या काळात बांधकामासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुढाकारही घेतला; परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडून हा निधी अद्यापही उपलब्ध करून दिलेला नाही.