बच्चे कंपनी दंग छंदोत्सवात!

By admin | Published: January 4, 2015 12:57 AM2015-01-04T00:57:29+5:302015-01-04T00:57:29+5:30

मुलांना वेगवेगळे छंद असतात पण सध्याच्या धावपळीच्या जगात त्यांच्या छंदाकडे पालकांचेही दुर्लक्ष होते आणि परिणामी मुलेही हिरमुसतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आपण नकळतपणे निसर्गापासून,

Child company rioting! | बच्चे कंपनी दंग छंदोत्सवात!

बच्चे कंपनी दंग छंदोत्सवात!

Next

सेतू संस्थेचे आयोजन : फोटोग्राफी ते वाईल्ड लाईफ चिमुकल्यांची धमाल
नागपूर : मुलांना वेगवेगळे छंद असतात पण सध्याच्या धावपळीच्या जगात त्यांच्या छंदाकडे पालकांचेही दुर्लक्ष होते आणि परिणामी मुलेही हिरमुसतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आपण नकळतपणे निसर्गापासून, प्राण्यांपासून आणि जगण्यापासूनही हिरावतो. पण सेतू संस्थेने मात्र मुलांची ही आवड जोपासली, त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या छंदांचे प्रदर्शनही आयोजित करून ते इतरांसमोर आणले. त्यामुळे मुले खूश झाली. गेल्या काही वर्षापासून सेतूतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्त मुलांना त्यांचे छंद जोपासताना मार्गदर्शन मिळावे म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आज झालेल्या कार्यशाळेत फोटोग्राफी आणि वाईल्ड लाईफची माहिती त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. ही रंजक माहिती आणि स्लाईड्स पाहून चिमुकले त्यात दंगले होते.
पालकांना सजग करणाऱ्या आणि मुलांचे भावविश्व हळुवार फुलविणाऱ्या सेतू संस्थेच्यावतीने दोन दिवसीय छंद महोत्सवाचे आयोजन पूर्णचंद्र बुटी सभागृह आणि प्रांगणात करण्यात आहे आहे. मुलांच्या विविध छंदांचे, वस्तूंचे, संग्रहांचे प्रदर्शन येथे आयोजित करण्यात आले आहे. मुलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमात मात्र आता मोठ्यांनीही रस घ्यायला प्रारंभ केला आहे. त्यामुळेच यंदा ८१ वर्षांच्या आजोबांसह तीन वर्षाच्या मुलीचाही या छंदोत्सवात सहभाग आहे. दुपारच्या सत्रात या छंदोत्सवात मुलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यात सुप्रसिद्ध छायाचित्रकार संगीता महाजन यांनी मुलांना छायाचित्रणाची माहिती दिली. छायाचित्रणाचा रंजक इतिहासही त्यांनी मुलांना सांगितला. पूर्वी कॅमेऱ्याचा आकार खूप मोठा होता त्यामुळे तो रणगाड्यावरच घेऊन फि रावे लागत होते. त्यावेळी एक फोटो काढण्यासाठी १५ मिनिटे लाग होती पण आज विज्ञानाने इतकी प्रगती केली की एका मिनिटात आपल्याला आता १५ फोटो मिळू शकतात. याप्रसंगी त्यांनी क्रीडा, फॅशन, वाईल्ड लाईफ, नेचर यांची फोटोग्राफी करताना येणाऱ्या अडचणी सांगून नवोदित हौशी छायाचित्रकार मुलांना काही टिप्स दिल्या. मुलांनीही त्यांना विविध प्रश्न विचारून आपले समाधान करून घेतले.
यानंतर बहार बावीस्कर यांनी मुलांना जंगल आणि जंगलातील प्राण्यांची माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून दिली. मुळात प्राण्यांचा मानवाला काहीही त्रास नाही पण मानवाचाच त्रास प्राण्यांना होत आहे. प्राणी सामान्यत: मानवी वस्तीत येत नाहीत पण आपण त्यांच्या क्षेत्रात गेल्यामुळे प्राण्यांचा त्रास मानवाला सहन करावा लागतो आहे. निसर्गाचे संवर्धन होत नसल्याने आणि जंगलाचे क्षेत्र कमी होत असल्याने प्राणी शहरात येत आहेत. याप्रसंगी त्यांनी नायलॉन मांजामुळे बंदरे, पक्षी जखमी होतात. त्यांच्यावर उपचार करताना येणाऱ्या अडचणी याबाबत माहिती दिली. पक्ष्यांना काही दिवस उपचारासाठी सोबत ठेवल्यानंतर त्यांना सोडून दिले तर इतर पक्षी त्यांना टोचून मारतात, हे चुकीचे आहे. असे काहीही होत नसते, असे बावीस्कर यांनी सांगितले. याप्रसंगी मुलांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी काही स्लाईड्सही दाखविल्या. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अमर दामले, स्नेहा दामले, स्वप्ना विठाळकर, मंजूषा लागू, मंगल लाडके. चंदन काशीकर आदींचे परिश्रम आहेत. (प्रतिनिधी)
प्रदर्शनातील वस्तूंच्या संग्रहाने प्रेक्षक थक्क
छंदोत्सवातील प्रदर्शनात अनेक थक्क करणाऱ्या वस्तूंचे संग्रह आहेत. यामागे त्या छंदवेड्यांचे परिश्रमही जाणवतात. येथे विविध देशांची नाणी, आगपेट्यांचा संग्रह, स्टॅम्पस, पेन, शंखशिंपले, पेपर क्राफ्ट्स, ओरिगामी, विविध पक्ष्यांची पिसे, फोटोग्राफ्स, एखाद्या विषयावरील इत्थंभूत माहिती, वृक्षांचे बीज आदी अनेक छंद जोपासणारे छंदवेडे येथे एकत्रित आले आहेत. त्यामुळेच हे प्रदर्शन अनुभविणे हा एक वेगळा अनुभव आहे. यात प्रथमेश मितकर, तुषार चाफले, मैत्री मार्कंडेयवार, श्रावणी वानखेडे, अबोली अंतापूरकर, त्रिंबक काळे, आशय ताकसांडे, धनश्री नागुलवार, वैष्णवी कडवे, गौरी दामले, प्रज्योत पालिमकर, उन्मेश पाटील, सई जानई, आकाश भावलकर, अन्शुली पत्की, दीपांकर काने आदींचे संग्रह प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले आहे.

Web Title: Child company rioting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.