मेळघाटात दररोज एक बालक मरणाच्या वाटेवर : बंडे साने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 11:38 PM2018-07-12T23:38:37+5:302018-07-12T23:42:41+5:30
मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अॅड. बंडू साने यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या २५ वर्षात १४ हजारांपेक्षा जास्त बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून वर्तमानात दररोज एक बालक मृत्यूच्या वाटेवर जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी यावेळी मांडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अॅड. बंडू साने यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या २५ वर्षात १४ हजारांपेक्षा जास्त बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून वर्तमानात दररोज एक बालक मृत्यूच्या वाटेवर जात असल्याचे विदारक वास्तव त्यांनी यावेळी मांडले.
मेळघाटमध्ये गेल्या २५ वर्षात कुपोषणामुळे झालेले बालमृत्यू, उपजतमृत्यू व मातामृत्यूची समस्या गंभीर आहे. याबाबत अनेक संघटनांनी, कार्यकर्त्यांनी निवेदन दिली, मोर्चे काढले, उपोषण केली परंतु, सरकारी अनास्थेमुळे अद्यापही प्रश्न कायम आहे. अनेक मंत्री, आमदार, खासदार, वैद्यकीय अधिकारी, मोठमोठी नेते, अशा सर्वांनी मेळघाटला भेटी दिल्या व परिस्थिती जाणली. तरीही ही समस्या सुटू नये हे कोडेच असल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार १९९३ ते २०१८ या काळात मेळाघाटात १४,२५५ बालमृत्यू झाले. उपजतमृत्यूची संख्या ३८४३ आहे तर वैद्यकीय अहवालानुसार गेल्या १८ वर्षात २२६ मातांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. एकतर सरकारकडून जाणीपूर्वक या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे किंवा योजना राबविणाऱ्या प्रशासनाकडून सरकारची धूळफेक केली जात असल्याचा आरोप साने यांनी केला. कुपोषणाचे भीषण वास्तव डोळ्यासमोर असताना आवश्यक त्या सोईसुविधा भागापर्यंत न पोहचणे ही शोकांतिका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मेळघाटात सोनोग्राफीची सोय नाही, एकही रक्तपेढी नाही, हव्या तेवढ्या प्रमाणात बालरोग तज्ज्ञ, प्रसुती तज्ज्ञ उपलब्ध होत नाही, भूलतज्ज्ञांचीही सेवा आणि दर्जेदार आरोग्य सुविधा येथील नागरिकांसाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत समस्या सुटेल ती कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनात आमदारांनी मेळघाटाच्या समस्यांकडे लक्ष वेधावे आणि सकारात्मक प्रतिसाद देत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला अॅड. दशरथ बावनकर, ललिता बेठेकर, अनिल राजने उपस्थित होते.