वेकोली बंकर परिसरात बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:13+5:302021-07-07T04:11:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : वेकाेली काेळसा खाणीच्या बंकर परिसरातील रेतीच्या उंच ढिगाऱ्यावर मित्रांसाेबत खेळताना नऊ वर्षीय बालकाचा जवळच ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : वेकाेली काेळसा खाणीच्या बंकर परिसरातील रेतीच्या उंच ढिगाऱ्यावर मित्रांसाेबत खेळताना नऊ वर्षीय बालकाचा जवळच असलेल्या विजेच्या हाय व्होल्टेज तारेला स्पर्श झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित असला तरी मुले या परिसरात राेज खेळतात. याकडे वेकाेली प्रशासनाचे मुळीच लक्ष नसते. ही दुर्दैवी घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्लेवाडा काेळसा खाण परिसरात मंगळवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
नक्ष चंद्रपाल साेनेकर (९, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. नक्ष आईवडिलांना एकुलता एक मुलगा असून, सिल्लेवाडा येथील शाळेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी हाेता. वेकाेलीच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बंकर क्रमांक-५ परिसरात एका रांगेत रेतीचे २५ ते ३० फूट उंच ढिगारे आहेत. त्यावर चढणे व घसरत खाली येणे मुलांसाठी आनंददायी असल्याने रेतीचे ढिगारे त्यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. यातील काही ढिगाऱ्यांवरून व जवळून विजेच्या हाय व्हाेल्टेज तारा गेल्या आहेत. काही ढिगारे तारांपेक्षाही उंच आहेत.
नक्ष त्याच्या पाच समवयस्क मित्रांसाेबत या ढिगाऱ्यावर राेज खेळायला जायचा. यातील एका ढिगाऱ्यावर खेळत असताना त्याचा हाय व्हाेल्टेज तारेला स्पर्श हाेताच क्षणभरात त्याचा मृत्यू झाला. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी घराच्या दिशेने पळ काढला. माहिती मिळताच कुटुंबीयांसह पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून वेकाेली प्रशासनाने नक्षच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरेे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
...
सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
मुळात हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तीला आत प्रवेश दिला जात नाही. घटनास्थळापासून १०० मीटरवर प्रवेशद्वार असून, तिथे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. असे असताना मुले राेज या रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळायला यायची. त्यांना आजवर एकाही सुरक्षारक्षकाने आत येण्यास प्रतिबंध केला नाही. सुरक्षारक्षकांनी मुलांना आत येऊ दिले नसते तर नक्षचा मृत्यू झाला नसता. त्यामुळे वेकाेलीच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.