बालकाचा डाेहात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:40 AM2021-02-05T04:40:37+5:302021-02-05T04:40:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : नातेवाइकांसाेबत नदीच्या पात्रात अंघाेळ करण्यासाठी उतरलेला बालक अनवधानाने डाेहात गेला आणि खाेल पाण्यात त्याचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : नातेवाइकांसाेबत नदीच्या पात्रात अंघाेळ करण्यासाठी उतरलेला बालक अनवधानाने डाेहात गेला आणि खाेल पाण्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेगरा येथील पेंच नदीपात्रात रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
अनुराग शिवदास श्रीवास (१३, रा. राहुल अपार्टमेंट, लष्करी बाग, नागपूर) असे मृत बालकाचे नाव आहे. घाेगरा (ता. पारशिवनी) हे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असल्याने अनुराग त्याच्या नातेवाइकांसाेबत येथे फिरायला आला हाेता. या सर्वांनी पूजा करण्यापूर्वी नदीच्या पात्रात अंघाेळीचा बेत आखला आणि ते पेंच नदीच्या पात्रात उतरले. साेबतच अनुरागही उतरला.
अंघाेळ करीत असताना अनुरागला पाण्याच्या खाेलीचा अंदाज घेता आला नाही. त्यामुळे ताे पात्रातील डाेहाच्या दिशेने गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. काहींनी लगेच पाण्यात उड्या घेऊन त्याला बाहेर काढले आणि पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. डाॅक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घाेषित केले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
....
सूचना फलकाकडे दुर्लक्ष
पेंच नदीच्या पात्रात पुरामुळे काही ठिकाणी खाेल खड्डे, तर काही ठिकाणी डाेह तयार झाले आहेत. त्या डाेहांमध्ये आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याने प्रशासनाने या परिसरात ठिकठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना नदीच्या पात्रात अंघाेळ करण्यासाठी अथवा पाेहण्यासाठी उतरू नये, असे आवाहन केले आहे. परंतु, कुणीही या सूचनांकडे गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे तीन महिन्यांत या ठिकाणी चाैघांचा बुडून मृत्यू झाला आहे. अलीकडच्या काळात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. येथे संस्थेच्यावतीने पर्यटकांकडून पैसे घेत त्यांना पावती दिली जाते. पैसे घेणाऱ्यांनी नागरिकांना अंघाेळ अथवा पाेहण्यास मज्जाव करायला हवा.