मातेच्या कडेवरून पडून चिमुकलीचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:37 AM2018-01-23T00:37:33+5:302018-01-23T00:46:28+5:30
सायकलच्या धडकेमुळे आईच्या कडेवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या पाच महिन्याच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. १८ जानेवारीला सकाळी ११.१५ वाजता कळमन्यातील भारतनगर चौकाजवळ हा अपघात घडला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायकलच्या धडकेमुळे आईच्या कडेवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या पाच महिन्याच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. १८ जानेवारीला सकाळी ११.१५ वाजता कळमन्यातील भारतनगर चौकाजवळ हा अपघात घडला होता.
उनगाव कामठी येथील रहिवासी देवीदास विठ्ठलराव मारबते (वय ३१) त्यांची पत्नी मनीषासोबत कळमन्यातून पायी जात होते. मनीषाच्या कडेवर त्यांची पाच महिन्यांची चिमुकली देवांशी होती. अचानक वेगात आलेल्या एका सायकलस्वाराने मनीषा यांना मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे मनीषाच्या कडेवर असलेली चिमुकली खाली पडून गंभीर जखमी झाली. तिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या चिमुकलीला सोमवारी डॉक्टरांनी मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी सायकलस्वाराचा शोध घेतला जात आहे.