सीताबर्डी पोलीस ठाण्यात आजपासून चाईल्ड फ्रेण्डली झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:09 AM2021-07-30T04:09:04+5:302021-07-30T04:09:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चिमुकल्यांना ठेवता येईल, ते रडून गोंधळ करणार नाही, अशी व्यवस्था असलेला चाईल्ड फ्रेण्डली झोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - चिमुकल्यांना ठेवता येईल, ते रडून गोंधळ करणार नाही, अशी व्यवस्था असलेला चाईल्ड फ्रेण्डली झोन (बालस्नेही कक्ष) सीताबर्डी पोलीस ठाण्यात निर्माण करण्यात आला असून, शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे महिलांना पोलीस ठाण्यात जावे लागते. महिला पोलीस ठाण्यात आली की त्यांच्या लहानग्यांची घाबरगुंडी उडते. अनेकजण रडून गोंधळ घालतात. त्यामुळे जबाब देणे, तक्रार नोंदविणे त्या महिलांना अन् पोलिसांनाही अवघड होते. ते लक्षात घेऊन परिमंडळ दोनच्या उपायुक्त विनिता साहू यांनी पोलीस ठाण्यात लहानग्यांसाठी एक कक्ष तयार करण्याची संकल्पना मांडली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याला मान्यता दिली. त्यानुसार, ठाणेदार अतुल सबनिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र प्रशस्त कक्ष तयार करून घेतला. या कक्षात लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, घसरगुंडी, पाळणा, बसविण्यात आला. महिलांना त्यांच्या बाळांना दूध पाजता यावे यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके यांच्या हस्ते पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत या ‘चाईल्ड फ्रेण्डली झोन’चा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.
---
महिला अधिकाऱ्यांसाठीही कक्ष
याच ठिकाणी (बाजूला) पोलीस ठाण्यातील महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्राम कक्ष निर्माण करण्यात आला आहे. तो सुद्धा शुक्रवारपासून महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
---