१० लाखांच्या खंडणीसाठी बालकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:52 AM2017-09-27T01:52:28+5:302017-09-27T01:52:45+5:30
अंगणात लहान भावासोबत खेळत असलेल्या ९ वर्षीय बालकाच्या अपहरणाची घटना दोन अपहरणकर्त्यांच्या अटकेने तब्बल दहा दिवसानंतर उजेडात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : अंगणात लहान भावासोबत खेळत असलेल्या ९ वर्षीय बालकाच्या अपहरणाची घटना दोन अपहरणकर्त्यांच्या अटकेने तब्बल दहा दिवसानंतर उजेडात आली. १० लाखांच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आले होते. मात्र अपहृत बालकाचा अद्याप सुगावा न लागल्याने संपूर्ण कामठी परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. तर आरोपींपैकी एकाने पोलीस कोठडीतील स्वच्छतागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
सुजल नेपाल वासनिक, असे अपहृत बालकाचे नाव असून तो लिहिगाव येथील रहिवासी आहे. अपहरणाची घटना १६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या वेळी घडली होती.
रामदास बाबूलाल मडावी व सुनील नवनाथ मेश्राम दोघेही रा. लिहिगाव, ता. कामठी अशी अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्यानी नावे आहेत.
अपहृत सुजलचे वडील नेपाल वासनिक हे पूर्वी शेती करायचे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या मालकीची दोन एकर शेती विकल्याने सध्या ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुजल हा लिहिगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकतो. तो शनिवारी (दि. १६) सायंकाळी त्याच्या लहान भावासोबत घरासमोर नेहमीप्रमाणे खेळत होता. दरम्यान, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तो अचानक बेपत्ता झाला.
सुजल बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्याच्या आई-वडिलांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तो कुठेही न गवसल्याने शेवटी नेपाल वासनिक यांनी कामठी (नवीन) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी भादंवि ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून सुजलचा शोध सुरू केला; सोबतच घरची मंडळीदेखील सुजलचा शोध घेत होती. दरम्यान, सोमवारी (दि. २५) सकाळी १० वाजता नेपाल वासनिक यांच्या घराशेजारी राहणाºया सागर बागडे यांच्या मोबाईलवर रामनाथने संपर्क केला. त्याने सुजलच्या वडिलांशी बोलायचे असल्याची सूचना केली. सागर बागडे यांनी नेपाल वासनिक यांना फोन दिला. तेव्हा रामदासने नेपाल वासनिक यांना सुजलच्या बदल्यात १० लाख रुपयांची मागणी केली. फोनवरच वाटाघाटी करत चार लाख रुपयांमध्ये हा सौदा ठरला. नेपाल वासनिक यांनी या फोन कॉलबाबत पोलिसांना माहिती दिली. ठरल्याप्रमाणे पोलिसांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारसा मार्गावरील पुलाजवळ सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सापळा रचला. नेपाल वासनिकही तिथे रक्कम घेऊन पोहोचले. त्यांनी रक्कम आणि मोबाईल पुलाजवळ ठेवला. त्यातच लपून बसलेला रामदास आजूबाजूला कुणीही नसल्याची खात्री पटताच बाहेर आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्या सांगण्यावरून रात्री सुनील मेश्रामला अटक करण्यात आली.
आरोपीला पैशाची निकड
रामदास हा सध्या बेरोजगार असून, त्याने काही दिवसांपूर्वी गुमथळा (ता. कामठी) येथे जिम सुरू केली होती. सध्या जीम बंद आहे. शिवाय, रामदासवर चार लाख रुपयांचे कर्ज असल्याने त्या कर्जाची त्याला परतफेड करावयाची होती. त्यामुळे अन्य दोन आरोपींच्या सूचनेवरून रामदासने नेपाल वासनिक यांना १० लाख रुपयांची मागणी केली. त्यातील चार लाख रुपये रामदासला मिळणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी हा सुजलचा शेजारी
रक्कम घेण्यासाठी रामदास बाहेर आला. त्याला पाहताच नेपाल वासनिक यांच्यासह पोलिसांनाही नवल वाटले. कारण रामदास हा नेपाल वासनिक यांच्या घराशेजारी राहतो; शिवाय सुजल बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा रामदास हा प्रत्येक वेळी नेपाल वासनिक यांच्या सोबत होता. विशेष म्हणजे, रामदासला ताब्यात घेतेवेळी सुजल त्याच्यासोबत नव्हता. सुजल नेमका कुठे व कशा अवस्थेत आहे, याबाबत कुणाला काहीही माहिती नाही.
अन्य आरोपी कोण?
नेपाल वासनिक यांची लिहिगाव शिवारात वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी संपूर्ण शेती विकली. त्यातून त्यांना भरपूर पैसा मिळाला. या पैशावर गावातील काहींचा डोळा होता. त्यातून सुजलच्या अपहरणाची योजना आखल्या गेली. सुजलचे अपहरण रामदासने केले नसून, ते अन्य दोघांनी केले आहे. त्या दोघांना रामदास चांगल्या तºहेने ओळखतो. त्याच्या सांगण्यावरून सुनील मेश्राम यास अटक करण्यात आली. अन्य एका आरोपीचे नाव व सुजलचा ठावठिकाणा मात्र दोघांनीही पोलिसांना सांगितले नाही. त्यामुळे या प्रकरणातील गुंता कायम आहे.