नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे बालकामगारास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:00 AM2018-03-28T11:00:17+5:302018-03-28T11:00:26+5:30
शहरातील शुक्रवारी बाजारातील हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या १५ वर्षीय बालकामगारास त्याच्या मालकाने चामड्याच्या बेल्टने बेदम मारहाण केली. यात पोलिसांनी आरोपीस मालकास मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरातील शुक्रवारी बाजारातील हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या १५ वर्षीय बालकामगारास त्याच्या मालकाने चामड्याच्या बेल्टने बेदम मारहाण केली. यात पोलिसांनी आरोपीस मालकास मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अटक केली.
सुशील रोपलानी (४५, रा. कामठी) असे अटक करण्यात आलेल्या मालकाचे नाव आहे. रोपलानी यांचे कामठी शहरातील शुक्रवारी बाजार, रुईगंज मैदान परिसरात हार्डवेअरचे दुकान असून, त्यांच्या दुकानात जेपीनगरात राहणारा १५ वर्षीय बालक अनेक दिवसांपासून काम करायचा. मालकाच्या क्रूर वर्तनामुळे तो त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याने सुशील रोपलानी यांना शुक्रवारी (दि. १६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास आपण काम सोडत असल्याचे सांगितले. त्यामुळे रोपलानी चिडले व ‘तू माझ्या दुकानातून काम सोडून जाऊ नको’, असे बजावत त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी या बालकास चक्क कंबरेच्या चामड्याच्या बेल्टने बेदम मारहाण केली.
मारहाण जिव्हारी लागल्याने त्या बालकाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत रात्री १० वाजताच्या सुमारास कामठी रेल्वेस्टेशन परिसरात पोहोचला. तो रात्री कुणालाही न सांगता घरून निघून गेल्याने आईने त्याचा शोध घेतला. सुदैवाने तो लवकर गवसला. आईने त्याची समजूत काढून त्याला घरी आणले. मालकाचा सततचा त्रास आणि त्याने केलेली मारहाण यामुळे आपण आत्महत्या करायला गेलो असल्याचेही त्याने आईला सांगितले. त्यामुळे आईने त्याला सोबत घेऊन सोमवारी (दि. २६) रात्री पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदविली. याप्रकरणी कामठी (जुने) पोलिसांनी भादंवि ३२३, ५०६, बालन्याय अधिनियम कलम ७५, ७९ अन्वये गुन्हा नोंदचिला.