नागपुरातील मुलीचा बालविवाह : ३० हजार रुपयात शेजाऱ्यांनी राजस्थानात विकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:36 AM2018-12-04T00:36:46+5:302018-12-04T00:38:36+5:30
उपराजधानीची गणना ही ‘स्मार्ट सिटी’मध्ये होत असून देशातील पुरोगामी शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र सर्व कायदे धाब्यावर बसवून शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री करण्यात आली आणि तिचा बालविवाह लावून देण्यात आला. संबंधित मुलगी कळमन्यातील असून शेजारच्या दोघांनी तिची ३० हजार रुपयात विक्री केली. पाच दिवसानंतर पीडित मुलीने तिच्या बहिणीला फोन केल्यानंतर या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा झाला. त्यानंतर कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सूत्रधार महिला आणि तिच्या मित्राला अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची गणना ही ‘स्मार्ट सिटी’मध्ये होत असून देशातील पुरोगामी शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र सर्व कायदे धाब्यावर बसवून शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री करण्यात आली आणि तिचा बालविवाह लावून देण्यात आला. संबंधित मुलगी कळमन्यातील असून शेजारच्या दोघांनी तिची ३० हजार रुपयात विक्री केली. पाच दिवसानंतर पीडित मुलीने तिच्या बहिणीला फोन केल्यानंतर या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा झाला. त्यानंतर कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सूत्रधार महिला आणि तिच्या मित्राला अटक केली आहे.
सोनाली प्रल्हाद शाहू (वय २६) तसेच स्वप्निल नरेंद्र नंदेश्वर (वय २८), अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कळमन्याच्या चिखली वस्तीतील गजानन मंदिराजवळच्या झोपडपट्टीत राहतात. पीडित मुलीला आई नाही. दोन मोठ्या बहिणी आणि वडील आहेत. हे कुटुंबीय आरोपी सोनालीच्या शेजारी राहते. त्यामुळे मुलीसोबत सोनालीची चांगली ओळख होती. मुलगी काहीशी महत्त्वाकांक्षी असल्याचे हेरून सोनालीने तिच्याभोवती जाळे टाकले. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात राजवाडे असून, तेथे साधे घरकाम करणाºया महिला मुलींना हजारो रुपये पगार मिळतो, अशी थाप मारली. तेथे आपले मित्र, नातेवाईक आहे. तुला तेथे सहज नोकरी लावून देतो, असे सांगत चांगल्या जीवनाचे स्वप्न दाखवून सोनालीने मुलीचे मन राजस्थानला जाण्यासाठी वळविले. घरच्यांना हा प्रकार सांगितल्यास ते तुला जाऊ देणार नाही, असे सांगत राजस्थानच्या नोकरीचा विषय घरी काढू नको, असेही बजावले. सोनालीच्या भूलथापांना बळी पडून मुलीने तिच्यासोबत चलण्याची तयारी दाखविली. त्यानुसार, २६ नोव्हेंबरच्या रात्री १०. ३० वाजता मुलीला घेऊन आरोपी सोनाली शाहू आणि तिचा मित्र स्वप्निल नंदेश्वर नागपुरातून बाहेर पडले. २७ नोव्हेंबरला रात्री ते राजस्थानमध्ये होते. आधीच दलालाला सांगून ठेवल्यामुळे दलाल आणि मुलीला विकत घेणारे तयार होते. तेथे पोहचताच सोनाली आणि स्वप्निलने मुलीला दलालाच्या हवाली केले. बदल्यात त्याच्याकडून ३० हजार रुपये घेतले. कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून दलालाने या १४ वर्षांच्या मुलीसोबत पैसे देणाऱ्याचे लग्न लावून दिले. त्यानंतर सोनाली आणि स्वप्निल नागपुरात पळून आले.
इकडे मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिचे वडील आणि बहिणी तिची शोधाशोध करीत होत्या.
मुलीवर पाशवी अत्याचार
मुलीला विकत घेऊन तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीने मुलीवर पाशवी अत्याचार सुरू केले. तिच्या वेदना दुर्लक्षित करून आरोपी तिला जनावरासारखे वागवू लागल्याने मुलगी हादरली. त्याच्या तावडीतून कशी सुटका करून घ्यावी, या विचारात असतानाच तिने तिला रविवारी रात्री संधी मिळाली. रविवारी रात्री ११ वाजता मुलीने आपल्या मोठ्या बहिणीच्या मोबाईलवर फोन करून तिला आपल्याला शेजारी राहणाऱ्या सोनाली आणि तिच्या मित्राने राजस्थानमधील बारा जिल्ह्यात आणून विकल्याचे सांगितले. येथे आपले लग्न एका मध्यमवयाच्या व्यक्तीशी लावून दिले असून, तो रात्रंदिवस आपल्यावर पाशवी अत्याचार करीत असल्याचेही सांगितले. मुलीने हा प्रकार वडिलांना सांगून रात्री पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला. नियंत्रण कक्षातून कळमना पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी लगेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क करून त्यांना कळमना ठाण्यात आणले. पहाटे ५ पर्यंत त्यांच्याकडून माहिती मिळवल्यानंतर पीएसआय अनिल मेश्राम यांनी आरोपी सोनाली तसेच स्वप्निलविरुद्ध अपहरण करून तिची विक्री करण्याच्या आरोपाखाली कलम ३६३, ३६६, ३७० अन्वये गुन्हा दाखल केला.
एकाला अटक, सोनालीची चौकशी
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रात्र झाल्यामुळे सोनालीला चौकशीत ठेवण्यात आले तर स्वप्निलला अटक करण्यात आली. सोनाली हीच या प्रकरणाची सूत्रधार आहे. तिने पतीसोबत काडीमोड घेऊन स्वप्निलसोबत मैत्री केल्याचेही तपासात पुढे आल्याचे पोलिसांकडून समजते. दरम्यान, तिने आणखी अशाप्रकारे किती महिला-मुली विकल्या, त्याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.