नागपुरातील लष्करीबागेत अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 10:40 PM2021-01-06T22:40:56+5:302021-01-06T22:42:43+5:30
Child marriage of a minor girl stopped , nagpur news लष्करीबागेत बुधवारी सकाळी १५ वर्षीय मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. त्याआधारे बालसंरक्षण पथकाने बुधवारी सकाळीच लग्नमंडपात छापा टाकून हा बालविवाह थांबविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लष्करीबागेत बुधवारी सकाळी १५ वर्षीय मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. त्याआधारे बालसंरक्षण पथकाने बुधवारी सकाळीच लग्नमंडपात छापा टाकून हा बालविवाह थांबविला. विशेष म्हणजे ही मुलगी अनाथ होती.
पीडित मुलीचे वय १५ वर्ष होते तर मुलगा २६ वर्षाचा होता. लग्नपत्रिका छापल्या होत्या. पेंडॉल टाकण्यात आला होता. सकाळी बाल संरक्षण पथक पोलिसांसोबत मंडपात पोहोचले. मुलीच्या वयाचा दाखला मागू लागले. नातेवाईकांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे कायद्याचा धाक नातेवाईकांना दाखविण्यात आला. त्यानंतर लक्षात आले की, मुलगी ही अनाथ आहे. ती आजीकडे राहत होती. तिला कुणीही कायदेशीर पालक नव्हते. ही कारवाई जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ समजावून सांगितला. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाह करण्यात येणार नाही, यासंदर्भात हमीपत्र लिहून घेतले. या मुलीला एक लहान भाऊ होता. दोघांनी बाल संरक्षण पथकांनी ताब्यात घेऊन, काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालकल्याण समितीच्या आदेशाने बालगृहात दाखल करण्यात आले.
७ बालविवाह रोखण्यात यश
कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन लागला होता. या काळात जिल्हा बाल संरक्षण पथकाला ७ बालविवाह रोखण्यात यश आले. यात प्रकल्प अधिकारी सचिन जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बालसंरक्षण अधिकारी विनोद शेंडे, सुजाता गुल्हाने, बाल पोलीस अधिकारी मनिष गोडबोले, अंगणवाडी सेविका पूजा वारके, जयश्री गिरडकर, जॉय मसीह यांचे सहकार्य लाभले.