लग्नात पोहचले सरकारी पाहुणे.. अन् अर्ध्यावरच मोडला लग्न सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 05:22 PM2022-01-23T17:22:24+5:302022-01-23T17:33:00+5:30
नवरी मुलगी अल्पवयीन असल्याच्या कारणाने हा विवाह सोहळा कायद्याने गुन्हा असल्याचे नवरी मुलीच्या पालकांना सांगण्यात आले. अल्पवयीन मुलीचे लग्न केल्यास गुन्हा ठरतो, हे जेव्हा पालकांना कळले, तेव्हा पालकांनीच लग्नसमारंभ रद्द केला.
नागपूर : यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरी रविवारी सकाळी लग्न समारंभाची तयारी सुरू होती. शामियाना टाकला होता. पाहुणे येण्याची लगबग सुरू झाली होती. हळद लावून नवरी तयार झाली होती. मारोतीच्या मंदिरातून नवरदेव मंडपाकडे मार्गक्रमण करीत होता. आनंदाचे वातावरण असताना, लग्नसोहळ्यात बाल संरक्षण पथक पोलीसांना घेऊन पोहचले. नवरी मुलगी अल्पवयीन असल्याच्या कारणाने हा विवाह सोहळा कायद्याने गुन्हा असल्याचे नवरी मुलीच्या पालकांना सांगण्यात आले. अल्पवयीन मुलीचे लग्न केल्यास गुन्हा ठरतो, हे जेव्हा पालकांना कळले, तेव्हा पालकांनीच लग्नसमारंभ रद्द केला.
बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्या २००६ नुसार मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ असल्याशिवाय लग्नाला कायदेशीर मान्यता नाही. लॉकडाऊनच्या काळात असे ११ लग्नसोहळे बाल संरक्षण पथकाने हाणून पाडले. रविवारी होणाऱ्या लग्नाची माहिती बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. महिला व बाल कल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांची टीम पाठविण्यात आली.
बाल संरक्षण पथकाने पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, विधी सेवा सेवक आर. एफ. पटेल, समुपदेशक अनिल शुक्ला, अंगणवाडी सेविका राजश्री शेंडे, दिप्ती शेंडे, धरती फुके, बाल संरक्षण अधिकारी साधना ठोंबरे, प्रतिमा रामटेके यांच्यासोबत लग्नघरी भेट दिली. मुलीचा जन्मदाखला मागण्यात आला. मुलगी अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाल्याने पथकाकडून पालकांना कारवाईचा धाक दाखविण्यात आला. अखेर पालकांनीच विवाह सोहळा रद्द केला.
- पालकांकडून घेण्यात आले हमीपत्र
मुलगीच्या आईवडीलांकडून मुलगी जेव्हापर्यंत १८ वर्षाची होत नाही, तोपर्यंत मुलीचे लग्न करणार नाही. केल्यास बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, यासंदर्भात हमीपत्र लिहून घेण्यात आले.
- यांच्यावरही होवू शकते कारवाई
अल्पवयीन मुलीचे अथवा मुलाचे लग्न लावल्यास मुलीचे व मुलाचे आईवडील नातेवाईक, मंडप डेकोरेशनवाले, सभागृहाचे मालक, बँण्डवाले, आचारी, कॅटरींगचे कॉन्ट्रॅक्टर, पंडित यांच्यावरही कारवाई होवू शकते, असे बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी सांगितले.