कामठीत रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:53+5:302021-03-20T04:07:53+5:30
हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच धडकले पथक नागपूर : लॉकडाऊनच्या काळात नागपूर जिल्ह्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालविवाहाच्या डझनभर कारवाया ...
हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच धडकले पथक
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात नागपूर जिल्ह्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालविवाहाच्या डझनभर कारवाया केल्या आहेत. शुक्रवारी कामठी तालुक्यात होत असलेला बालविवाह थांबविण्यात आला. विशेष म्हणजे मुलीच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच पथक लग्नघरी पोहचले. कामठी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन बालविवाहाच्या घटना रोखण्यात आल्या.
कामठीमध्ये बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी एक पथक तयार करून शुक्रवारी पथकाने मुलीचे घर गाठले. मुलीच्या वयाचे पुरावे मागितले असता, तिचे वय १७ वर्षे आढळले. पथकाने मुलीच्या घरच्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन त्यांचे समुपदेशन केले. मुलींच्या घरच्यांकडून बंधपत्र लिहून घेण्यात आले. या कारवाईत भारती मानकर, नायब तहसीलदार उके, संजय कांबळे, विनोद शेंडे, साधना हटवार, पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. कारणेकर, मनीषा कोल्हे, मंगला कारेमोरे आदी सहभागी होते.