काेराेनाकाळात गुप्तपणे हाेताहेत बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:17+5:302021-07-21T04:07:17+5:30

नागपूर : महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. त्यातही नागपूरचा साक्षरता दर बऱ्यापैकी चांगला असून मुलगा-मुलगी हा भेदाभेदही ...

Child marriages are secretly practiced in the past | काेराेनाकाळात गुप्तपणे हाेताहेत बालविवाह

काेराेनाकाळात गुप्तपणे हाेताहेत बालविवाह

Next

नागपूर : महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. त्यातही नागपूरचा साक्षरता दर बऱ्यापैकी चांगला असून मुलगा-मुलगी हा भेदाभेदही ठेवणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र, काेराेना महामारीच्या झटक्याने बहुतेकांची आर्थिक वाताहत केली आहे. त्यामुळे बालविवाहाची कुप्रथा पुन्हा डाेके वर काढायला लागली आहे. नागपूरसारख्या जिल्ह्यातही काेराेना काळात गुप्तपणे बालविवाह झाल्याचे प्रकार समाेर येत आहेत. जिल्हा महिला व बालसंरक्षण विभागाने गेल्या दीड वर्षाच्या काळात तयारीत असलेले १७ बालविवाह राेखले. यावरून हा प्रकार किती गंभीर स्वरूप घेत आहे, हे लक्षात येईल.

काेराेनामुळे अनेक गाेष्टींवर परिणाम केले आहेत. याकाळात सर्वाधिक नुकसान झाले ते शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे. अशा विवंचनेत गरीब कुटुंबातील मुलींना बालविवाहासारख्या कालबाह्य कुप्रथेला सामाेरे जावे लागते आहे. हाेय, गेल्या दीड-दाेन वर्षापासून उपराजधानीत बालविवाह वाढीस लागल्याचे उघडकीस आले आहे. दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, शिवाय राेजगार नसल्याने आईवडिलांवर आलेला आर्थिक ताण यामुळे पालकही मुलींना भार मानून ताे कमी करण्यासाठी अल्पवयातच मुलींचे विवाह करण्यास धजावत आहेत. बालसंरक्षण विभागाने या काळात १७ विवाह राेखण्यात यश मिळविले पण जे उजेडात आले नाही, असे कितीतरी विवाह झाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राेखण्यात आलेल्या विवाहांमध्ये जिल्ह्यात १४ तर शहरात ३ प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणात २००६ च्या बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार जिल्ह्यातील ७५४ पैकी केवळ ९२ शाळा सुरू झाल्या तर ६६२ शाळा अद्याप बंद आहेत. यामध्ये ३५८० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र

शाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात ग्रामीण भागात अशा घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, बालसंरक्षण विभागाकडे याबाबत आकडा नाही. काही मुलींना मंगळसूत्र न घालू देता शाळेत पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ज्यांची लग्ने झाली, त्यांच्या शाळाच सुटल्याचेही सत्य आहे.

दारिद्र्य, आर्थिक विवंचना हेच कारण

गेल्या दीड वर्षात शहर आणि ग्रामीण मिळून १७ बालविवाह राेखण्यात आले. यातील कुटुंबीयांना विचारले असता बहुतेकांनी आर्थिक विवंचना हेच कारण सांगितले. काेराेना काळात राेजगार गेल्याने कुटुंबांना प्रचंड संकटांना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे अत्यल्प खर्चात मुलींचे लग्न उरकून भार कमी करण्याची पालकांची मानसिकता असल्याचे दिसून येत आहे.

- मुश्ताक पठाण, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

पटसंख्या कमी झालेल्या मुली जातात कुठे?

ग्रामीण भागात दरवर्षी आठवीनंतर मुलींची पटसंख्या कमी होते. या मुली जातात कुठे? याचा शोध घ्यायला हवा. बहुतेक मुलींची लग्ने करून देण्यात येतात तर काहींची शाळाच बंद केली जाते. काेराेना काळात आर्थिक परिस्थिती खालावल्याने मुलींची विवाह उरकले गेल्याचे सांगतिले जात आहे. मात्र, शैक्षणिक,सामाजिक मागासलेपणा व धार्मिक पगडा आहे. मुलगी ही जबाबदारी असून लग्न हे आपल्या समाजात चांगले मानले जाते. त्यामुळे लग्न करून माेठे कार्य केल्याची लाेकांची मानसिकता असते.

- रूबीना पटेल, सामाजिक कार्यकर्त्या

माहिती मिळाली तर कारवाई

महिला व बालविकास विभागाला सूचना मिळताच पथक कारवाईसाठी जाते व बालसंरक्षण अधिनियम-२००६ अंतर्गत कारवाई केली जाते. ज्या मुलींचे लग्न माेडण्यात यश आले, अशांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी महिला व बालकल्याण समितीकडे पाठपुरावा केला जाताे. बालविवाहाबाबत तक्रारी करण्यास नागरिकांनी पुढे यावे.

- अर्पणा काेल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

Web Title: Child marriages are secretly practiced in the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.