राज्यात बालमृत्यूचा दर घसरतोय : आरोग्यमंत्र्यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 08:17 PM2017-12-20T20:17:52+5:302017-12-20T20:19:28+5:30
राज्यात बालमृत्यूची समस्या कायम असली तरी बालमृत्यूच्या दरामध्ये सातत्याने घट होत आहे. २०११ मध्ये मृत्यूचा दर २५ इतका होता. तो २०१६ मध्ये १९ वर पोहोचला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यात बालमृत्यूची समस्या कायम असली तरी बालमृत्यूच्या दरामध्ये सातत्याने घट होत आहे. २०११ मध्ये मृत्यूचा दर २५ इतका होता. तो २०१६ मध्ये १९ वर पोहोचला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. हेमंत टकले, शरद रणपिसे, संजय दत्त इत्यादी सदस्यांनी या मुद्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती.
केंद्र शासनाच्या ‘एसआरएस’ या सर्वेक्षणानुसार राज्यातील बालमृत्यूचा दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. नवजात बालकांवर उपचारासाठी राज्यात त्रिस्तरीय योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक प्रसूतीगृह व शस्त्रक्रियागृहामध्ये ‘न्यू बॉर्न केअर कॉर्नर’, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयस्तरावर ‘न्यू बॉर्न स्टॅबिलायझेशन युनिट’ आणि जिल्हा रुग्णालयस्तरावर ‘स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट’ कार्यरत आहे. राज्यात सद्यस्थितीत ३६ ‘एसएनसीयू’ कार्यान्वित असून, दरवर्षी ५० हजारांहून अधिक बालकांवर उपचार करण्यात येतात. २०११-१२ मध्ये येथील मृत्यूंचे प्रमाण १२ टक्के इतके होते. आॅक्टोबर २०१७ मध्ये हेच प्रमाण ८ टक्क्यांवर आले असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
नाशिकमध्ये आॅगस्ट महिन्यात ३४५ नवजात बालके दाखल झाली व यातील ५५ बालकांचा मृत्यू झाला. अपुऱ्या दिवसाचे बाळ, जन्मत: श्वसनावरोध, श्वसनाचा आजार, जंतूसंसर्ग इत्यादी कारणांमुळे हे मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.