बाल मृत्यूचा दर आणला दोन टक्क्यांवर : राज्यात डागा रुग्णालय अव्वल स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:31 AM2019-05-12T00:31:26+5:302019-05-12T00:32:47+5:30
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाचा बाल मृत्यूचा दर पूर्वी सात टक्के होता. लहान मुलांची परिचारिका म्हणून ओळख असलेल्या एका परिचारिकेने यावर प्रचंड मेहनत घेतली. तीन वर्षांतच त्यांनी बाल मृत्यूचे प्रमाण दोन टक्क्यांवर आणले. राज्यात डागा रुग्णालय मृत्यू दर कमी करणारे हे पहिले रुग्णालय ठरले. विशेष म्हणजे, याची दखल जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने ‘राणी एलिझाबेथ क्विन ट्रस्ट’, लंडनने घेतली. त्यांनी त्या परिचारिकेच्या कार्यावर एक लघुपट तयार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाचा बाल मृत्यूचा दर पूर्वी सात टक्के होता. लहान मुलांची परिचारिका म्हणून ओळख असलेल्या एका परिचारिकेने यावर प्रचंड मेहनत घेतली. तीन वर्षांतच त्यांनी बाल मृत्यूचे प्रमाण दोन टक्क्यांवर आणले. राज्यात डागा रुग्णालय मृत्यू दर कमी करणारे हे पहिले रुग्णालय ठरले. विशेष म्हणजे, याची दखल जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने ‘राणी एलिझाबेथ क्विन ट्रस्ट’, लंडनने घेतली. त्यांनी त्या परिचारिकेच्या कार्यावर एक लघुपट तयार केला.
वैशाली निरंजन मेंढे त्या परिचारिकेचे नाव. डागा रुग्णालयात मेट्रन या पदावर कार्यरत आहे.
डागा रुग्णालयात २०१३ पासून ४२ खाटांचे ‘स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट’ (एसएनसीयू) आहे. सर्व सोयी असताना त्यावेळी बाल मृत्यूचा दर सात टक्क्यांच्या वर होता. आपल्या ३१ वर्षांच्या विविध इस्पितळात सेवा दिल्यानंतर मेंढे यांची बदली २०१५ मध्ये डागा येथे झाली. मेंढे यांनी १९९७ मध्ये लहान मुलांचा आजार व देखभाल या विषयावर उच्च शिक्षण घेतले. त्यांना या कार्याचा मोठा अनुभवही होता. डागा रुग्णालयाचा कारभार हाती घेताच ‘एसएनसीयू’वर विशेष अभ्यास केला. काही नियम तयार करीत त्याचे कठोरतेने पालन करण्यास सर्वांना भागही पाडले.
‘ऑटोक्लेव्ह’चा वापर फायद्याचा
मेंढे यांनी सांगितले, डागाचा ‘एसएनसीयू’मध्ये ४२ ‘बेबी इनक्यूबेटर’ आहे. यात कमी वजनाचा व कमी दिवसांच्या बाळाना ठेवले जाते. या मुलांना लवकर ‘इन्फेक्शन’ होऊन जीवाचा धोका असतो. यामुळे ‘ऑटोक्लेव्ह’ (वाफेवर तापणारे निर्जतुकीकरणाचे यंत्र) केलेल्या वस्तूच वापरण्याचा नियम तयार केला. यामुळे बाळाचा औषधांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ट्रे’पासून ते यंत्र साफ करण्याचा कापडापर्यंत सर्व वस्तू ‘ऑटोक्लेव्ह’ करूनच वापरले जाऊ लागले. सोबतच आठवड्यातून एकदा ‘एसएनसीयू’चा खोलीमध्ये ‘फॉगिंग’ केले जाऊ लागले. याचा फायदा झाला, अणि तीन वर्षांतच ‘डेथ रेट’ कमी झाला. याचे श्रेय वैद्यकीय अधिक्षक डॉ. सीमा पारवे यांचा मार्गदर्शनात २४ तास राबणारी डॉक्टर व परिचारिकांची चमू यांनाही जाते.
मातांनाही प्रशिक्षण
ज्यांचे बाळ ‘एसएनसीयू’मध्ये आहे त्या मातांना स्वच्छता कशी राखावी, दूध कसे पाजावे याचे प्रशिक्षणही दिले जात असल्याचे मेंढे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मातांना ‘एसएनसीयू’मध्ये सोडताना त्यांना विशिष्ट गाऊन, कॅप, मास्क, हॅण्ड वॉश करूनच पाठविले जाते. विशेष म्हणजे, येथील बालकांसाठी केवळ ‘पॅम्पर्स’चाच उपयोग केला जात असल्याने मातांकडून होणारे संसर्गाचे प्रमाणही कमी झाले.
मेडिकलमध्ये पाठविणाऱ्या रुग्णांची संख्याही झाली कमी
पूर्वी ‘एसएनसीयू’मध्ये गंभीर प्रकृती झालेल्या बालकांना मेडिकलमध्ये ‘रेफर’ केले जायचे. याचे प्रमाण वर्षाला ३५० च्यावर होते. परंतु आता डागा रुग्णालयातच आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याने हे प्रमाण ७० ते ८० वर आल्याचेही मेंढे यांनी सांगितले.
लघुपटातून जनजागृती
डागा रुग्णालयात बाल मृत्यूचा दर कमी झाल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने ‘राणी एलिझाबेथ क्विन ट्रस्ट’, लंडनने घेतली. या ट्रस्टने वैशाली मेंढे यांनी अमलात आणलेल्या कार्यपद्धतीवर एक लघुपट तयार केला. हा लघुपट हॉस्पिटलमध्ये जनजागृती म्हणून दाखविला जात आहे.