जागतिक रेकॉर्डसाठी बालवैज्ञानिकांनी केली उपग्रहांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 07:00 AM2021-01-20T07:00:00+5:302021-01-20T07:00:07+5:30
Nagpur news तामिळनाडूतील रामेश्वरम येथे ७ फेब्रुवारीला जागतिक रेकॉर्ड बनविण्याची तयारी सुरू आहे. यासाठी देशभरातील १ हजार विद्यार्थी १०० उपग्रह बनवित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तामिळनाडूतील रामेश्वरम येथे ७ फेब्रुवारीला जागतिक रेकॉर्ड बनविण्याची तयारी सुरू आहे. यासाठी देशभरातील १ हजार विद्यार्थी १०० उपग्रह बनवित आहेत. ते उपग्रह अंतराळात ७ फेब्रुवारीला सोडण्यात येणार आहे. या जागतिक विक्रमासाठी मंगळवारी विदर्भातील विद्यार्थ्यांनी उपग्रहाची निर्मिती केली. विदर्भातून या उपक्रमासाठी १५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी नागपुरातील सेंट विसेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये पहिल्यांदा प्रत्यक्ष उपग्रह बनविला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचा हा उपक्रम आहे. शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांचे योगदान वाढावे ही यामागील संकल्पना आहे. यात जगातील सर्वात कमी वजनाचे १०० उपग्रह बनवून ७ फेब्रुवारी रोजी ३८००० मीटर उंचीवर सोडण्यात येणार आहेत. हे उपग्रह प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेऊन पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. हा उपक्रम एक जागतिक विक्रम होणार आहे. यासाठी शहरातील मनपाच्या शाळा, गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेबरोबरच गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून विद्यार्थ्यांची यात निवड झाली आहे. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना ६ दिवस ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. मंगळवारी या विद्यार्थ्यांना नागपुरात बोलावून फाउंडेशनतर्फे त्यांना उपग्रह तयार करण्यासाठी कीट देण्यात आली. १० विद्यार्थ्यांची एक टीम तयार करून प्रत्येक टीमकडून एक उपग्रह तयार करण्यात आला. - ही तयारी एका जागतिक विक्रमाची आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले १०० वर्किंग सॅटेलाईट एकाच वेळी रामेश्वरमच्या लाँच पॅडवरून ३८ हजार मीटर उंचीवर हेलियम बलूनच्या साहाय्याने पाठविणार आहे. जगात पहिल्यांदा असा विक्रम होणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे नाव त्यात नोंदविले जाणार आहे. - विशाल लिचडे, कोअर टीम मेंबर, एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन - आम्ही विद्यार्थ्यांना सॅटेलाईट तयार करण्याचे सर्व साहित्य दिले आहे. यात मायक्रोकंट्रोलर बोर्ड, सेन्सर, बॅटरी आहे. विद्यार्थ्यांनी हे तयार केल्यानंतर त्याचे प्रात्याक्षिक आम्ही येथेच घेणार आहोत. ते वर्किंगमध्ये आल्यानंतर सॅटेलाईट रामेश्वरमला जाणार आहे. आकाशात सोडल्यानंतर हे सॅटेलाईन वातावरणाच्या नोंदणी घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी स्पेस, सॅटेलाईट पुस्तकात वाचले आहे. आम्ही सॅटेलाईट त्यांच्याकडून प्रत्यक्ष बनवून घेत आहोत. - अजिंक्य कोत्तावार, विदर्भ समन्वयक, एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन - आम्हाला आज कीट देण्यात आली होती. प्रत्येक पार्टचा आम्ही अभ्यास केला. त्याला असेंबल केले. प्रोग्रामिंगही करून पाहिले. ते वर्किंगमध्ये आले आहेत. आम्ही बनविलेले सॅटेलाईट आकाशात उडणार, त्याची रेकॉर्डमध्ये नोंद होणार हे आमच्यासाठी आनंददायी आहे. - स्वाती मिश्रा व काजल शर्मा, विद्यार्थिनी