मेडिकलमध्ये बालशल्यक्रिया मिशन : अन्न व श्वासनलिका जुळलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:55 PM2019-02-18T23:55:19+5:302019-02-18T23:58:16+5:30
अन्न व श्वासनलिका जुळून असलेल्या सहा महिन्यांच्या दोन बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्यात आले. या सारख्या दुर्मिळ व गुंतागुंतीच्या २५वर शस्त्रक्रियेसह आणखी १५० शस्त्रक्रिया मेडिकलच्या ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागात होऊ घातल्या आहेत. ‘बाल शल्यक्रिया मिशन’ अंतर्गत या शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आले असून सोमवारी याचे औपचारिक उद्घाटन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व श्वासनलिका जुळून असलेल्या सहा महिन्यांच्या दोन बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्यात आले. या सारख्या दुर्मिळ व गुंतागुंतीच्या २५वर शस्त्रक्रियेसह आणखी १५० शस्त्रक्रिया मेडिकलच्या ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागात होऊ घातल्या आहेत. ‘बाल शल्यक्रिया मिशन’ अंतर्गत या शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आले असून सोमवारी याचे औपचारिक उद्घाटन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले.
विदर्भातील, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अकोला आदी भागातील शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असलेल्या १५० बालरुग्णांची तपासणी करून त्यांना मेडिकलमधील ‘बालशल्यक्रिया मिशन’मध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. यात ज्या बालकांचे कुबड निघाले आहे, जन्मत:च लघवीची पिशवी नाही, अन्ननलिका तयार झाली नाही, अन्न व श्वसननलिका जुळलेली आहे, श्वसननलिकेशी फुफ्फुस न जुळता अन्ननलिकेशी जुळलेले आहे, अशा दुर्मिळातील दुर्मिळ शस्त्रक्रिया या ‘मिशन’ अंतर्गत केल्या जाणार आहेत. १८ ते २३ फेब्रुवारीपर्यंत या शस्त्रक्रिया चालणार आहे. परंतु रुग्णांची संख्या पाहता चार दिवस आधीपासून शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत विविध रोगांवरील २५ शस्त्रक्रिया झाल्या असल्याची माहिती पेडियाट्रिक सर्जरी विभागाचे डॉ. नीलेश नागदिवे यांनी ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले अमरावती जिल्ह्यातील सहा महिन्यांच्या दोन बाळांची अन्ननलिका व श्वसननलिका जुळलेली होती. यामुळे त्यांना वारंवार फुफ्फुसामध्ये ‘इन्फेक्शन’ व्हायचे. उद्घाटनानंतर या दोन्ही चिमुकल्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
तब्बल १२ वर्षांनंतर ती जेवू शकणार
एका १२ वर्षाच्या मुलीची अन्ननलिका बंद झाली होती. जेवण केले की उलटी व्हायची. जन्मापासून ते आतापर्यंत ती द्रवपदार्थावरच होती. यामुळे ती अतिशय अशक्त झाली होती. मेडिकलच्या ‘बालशल्यक्रिया मिशन’मध्ये तिचा समावेश करण्यात आला. तिच्यावर सोमवारी दुर्बिणद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून अन्ननलिकेमधील ‘ब्लॉक’ दूर करण्यात आले. यामुळे लवकरच ती जेवू शकणार आहे.
गर्भात असतानापासून होती किडनीवर सूज
गर्भात असतानापासून एका बाळाच्या किडनीवर खूप मोठी सूज होती. लघविच्या पिशवितून लघवी एका विशिष्ट दिशेने न जाता वरच्या दिशेन जात होती. पाच महिन्याच्या या बाळावर अत्यंत गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.