मुलांची विदेशात तस्करी प्रकरण : चार आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:42 PM2018-01-23T23:42:17+5:302018-01-23T23:44:31+5:30

बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या नागपुरातील १० दाम्पत्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. रुल्डासिंग गुजर, बलबीरसिंग मुलतानी, अजितसिंग मुलतानी आणि मनजितसिंग घोत्रा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.

Child trafficking abroad cases: Four accused arrested | मुलांची विदेशात तस्करी प्रकरण : चार आरोपी गजाआड

मुलांची विदेशात तस्करी प्रकरण : चार आरोपी गजाआड

Next
ठळक मुद्देचौकशीत आढळली आक्षेपार्ह कागदपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या नागपुरातील १० दाम्पत्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. रुल्डासिंग गुजर, बलबीरसिंग मुलतानी, अजितसिंग मुलतानी आणि मनजितसिंग घोत्रा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
सर्व आरोपी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकानाका भागातील रहिवासी असून, त्यांनी गेल्या १० वर्षांत नागपुरातील ५० ते ६० मुलांना इंग्लंड (यूके) विदेशात नेऊन सोेडल्याचे स्पष्ट झाले आहे. २००७ ते २०१७ या १० वर्षांच्या कालावधीत नागपुरातून विदेशात गेलेली ५० मुले पुन्हा भारतात परतलीच नसल्याची बाब ब्रिटिश उच्चायुक्तांच्या लक्षात आल्यानंतर, सप्टेंबर २०१७ मध्ये हे प्रकरण भारतीय उच्चायुक्तांसह दिल्ली दूतावासाला कळविण्यात आले. दिल्लीतून नागपूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या गंभीर प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखा आणि विशेष शाखेतून सुरू झाली. मुले विदेशात नेऊन सोडणाऱ्या आरोपींनी पासपोर्ट आणि व्हिसा तयार करण्यासाठी शाळांमधून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे ५० ते ६० मुले नागपुरातून विदेशात नेण्यात आल्याचे उघड झाले. या खळबळजनक प्रकरणाचे पुरावे मिळाल्यानंतर, सोमवारी २२ जानेवारीला गुन्हे शाखेने पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुमित तसेच तिचा पती राजेंद्रसिंग अटवाल, परमजित आणि तिचा पती रुल्डासिंग गुजर, सुरिंदर आणि तिचा पती जर्नलसिंग घोत्रा, जगविंदरसिंग आणि पियरासिंग, परमजितसिंग आणि सतवीरसिंग घोत्रा, कुलजित आणि मनजितसिंग घोत्रा, सतवंतसिंग निशांतसिंग घोत्रा, मनजित आणि काश्मीरसिंग घोत्रा, निर्मल आणि अजितसिंग, परविंदर आणि तिचा पती अजितसिंग मुलतानी तसेच जसविंदरसिंग बलबीरसिंग मुलतानी या १० दाम्पत्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या सर्वांची मंगळवारी पहाटेपर्यंत चौकशी केल्यानंतर रुल्डासिंग गुजर, बलबीरसिंग मुलतानी, अजितसिंग मुलतानी आणि मनजितसिंग घोत्रा या चौघांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करून, त्यांची १० दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली.
चौकशीदरम्यान या सर्वांच्या निवासस्थानी पोलिसांनी तपासणी केली असता, त्यांना आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली. पोलिसांनी ती जप्त केली.
भारतात परतली, कुठे आहेत, माहीत नाही
विशेष म्हणजे, २००७ पासून २०१७ पर्यंत अर्थात गेली १० वर्षे हा गोरखधंदा करणाऱ्या उपरोक्त आरोपींची आलिशान निवासस्थाने आहेत. अनेक जण ट्रान्सपोर्टर म्हणून ओळखले जातात. प्रत्यक्षात ट्रान्सपोर्टच्या नावाखाली हे आरोपी आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे रॅकेट चालवीत होते. एका मुलाला इंग्लंड(यूके)मध्ये नेऊन सोडण्यासाठी ते त्याच्या पालकाकडून दोन लाख रुपये उकळत होते. इंग्लंडमध्ये बक्कळ पगाराची नोकरी मिळणार, या आशेपोटी संबंधित पालक आरोपींना रक्कम द्यायचे.
दरम्यान, यासंबंधाने आज सायंकाळपर्यंतच्या चौकशीत नागपुरातून विदेशात गेलेल्या ५० ते ६० मुलांपैकी २० ते २५ मुले नागपुरात परत आली; नंतर ती कुठे गेली, हे कळायला मार्ग नाही. ती सध्या नागपुरात नाहीत. भारतातही आहेत की नाही, हे उघड झाले नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात. ते कुठे आहेत, त्याची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठांचे सांगणे आहे.
दलालही गजाआड
या रॅकेटची महत्त्वाची कडी असलेला शिवराजसिंग राठोड नामक दलाल रात्री पोलिसांच्या हाती लागला. वृत्त लिहिस्तोवर त्याची चौकशी सुरू होती. तो उपरोक्त आरोपींना मुलांची बनावट कागदपत्रे तयार करून देत होता, असे सूत्रांचे सांगणे आहे. त्याने आतापावेतो अशाप्रकारे अनेक मुलांची बनावट कागदपत्रे तयार करून रॅकेटमधील आरोपींना सोपविल्याचीही माहिती आहे.
विदेशात गेलेल्या मुलांची कोंडी
बक्कळ रकमेची नोकरी मिळणार, आलिशान जीवन जगायला मिळेल, या आशेने विदेशात गेलेल्या तरुणांची तिकडे कोंडी झाली आहे. विशिष्ट कारण सांगून विशिष्ट मुदतीसाठी ब्रिटनमध्ये गेलेले हे तरुण तेथे नियोजित मुदतीपर्यंत मिळेल ते काम करीत होते. मात्र, नंतर त्यांच्या व्हीजाची मुदत संपल्यामुळे ते ब्रिटनमध्ये घुसखोर ठरले. त्यांना तेथून हाकलून लावण्याची ब्रिटन सरकारने भूमिका घेतल्यामुळे त्या तरुणांची मोठी कोंडी झाल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे.

Web Title: Child trafficking abroad cases: Four accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.