बालतस्करी रॅकेट; श्वेता खानने राजस्थानातही विकले मूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 04:41 PM2022-11-21T16:41:12+5:302022-11-21T16:46:46+5:30
सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत वाढ
नागपूर : मुलांच्या खरेदी-विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या श्वेता खानने राजस्थानात एका मुलाला विकले होते. कळमना पोलिस अवैध संबंधातून जन्माला आलेल्या या बालकाचा शोध घेत आहेत. आता श्वेता, सचिन आणि त्यांच्या साथीदारांनी तसेच प्रजापती दाम्पत्याने विकलेल्या मुलांची संख्या सातवर गेली आहे. दरम्यान, पोलिसांनी श्वेता आणि प्रजापती दाम्पत्याची कोठडी सोमवार, २१ नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.
मुलांच्या खरेदी-विक्रीच्या रॅकेटमध्ये श्वेता साळवे ऊर्फ खान आणि त्यांचा साथीदार सचिन पाटीलची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्वेता तपासात सत्यस्थिती सांगण्याचे टाळत असली तरी तिच्याबाबत रोज नवे खुलासे होत आहेत. श्वेताने सचिनच्या मदतीने काही महिन्यांपूर्वी अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बालकाला गुजरातमध्ये विकले आहे. बालकाची आई आणि खरेदी करणारे हाती न लागल्याने संपूर्ण प्रकरण समोर आले नाही. यापूर्वी श्वेता आणि सचिन पाटील यांचा कळमनातून चोरी केलेल्या आठ महिन्यांचा बालक आणि अंबाझरी ठाण्याच्या परिसरातील एका बालकाच्या विक्रीत हात असल्याची पुष्टी झाली आहे.
कळमना प्रकरणामुळे संपूर्ण रॅकेट उजेडात आले आहे. या रॅकेटमध्ये योगेंद्र प्रजापती आणि त्याची पत्नी रिता अटकेत आहेत. प्रजापती दाम्पत्याने कळमन्यातील बालकाशिवाय स्वत:च्या दोन मुलांना आणि एका मुलीला विकले आहे. त्यांचा एक मुलगा पोलिसांच्या हाती लागला आहे. श्वेता खान पूर्वी धंतोलीच्या एका हॉस्पिटलमध्ये परिचारिका होती. दरम्यान, ती अवैध संबंधातून गर्भपात करण्यासाठी आलेल्या युवतींच्या संपर्कात आली. अशा युवतींच्या मदतीने ती मुलांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करू लागली. पकडले गेल्यानंतर तिच्याविरुद्ध कोतवाली तसेच सीताबर्डीत मुलांच्या विक्रीचे गुन्हे दाखल झाले. सचिनही तिच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेचा चालक म्हणून कार्यरत होता. श्वे
ताने सचिनला आपल्या रॅकेटमध्ये सामील करून घेतले. सचिन कचरा संकलनाच्या एजन्सीत काम करतो. दोघेही गर्भपात करण्यासाठी इच्छुक युवतींची प्रसूती करून घेण्यासाठी तत्पर राहत होते. त्यांना प्रसूतीचा खर्च देण्यासह मुलाच्या विक्रीतून कमाई होत असल्याचे सांगत होते. त्यामुळे गरीब युवती मूल विकण्यासाठी तयार होत होत्या. गुजरातमध्ये विकलेल्या मुलाचे प्रकरणही असेच आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर श्वेता आणि प्रजापती दाम्पत्याला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सोमवारपर्यंत त्यांची कोठडी वाढविली आहे.
राजश्रीच्या अटकेत ‘लुटेरी दुल्हन’चा हात
नवजात बाळाची पाच लाखांत विक्री करणारी कथित समाजसेविका राजश्री सेनची सत्यस्थिती समोर आणण्यात एकेकाळी तिच्या विश्वासातील ‘लुटेरी दुल्हन’ची भूमिका महत्त्वाची आहे. लुटेरी दुल्हनविरुद्ध अनेक ठाण्यांत वसुलीचे गुन्हे दाखल आहेत. राजश्रीमुळेच आपल्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची तिला शंका होती. त्यामुळे ती राजश्रीवर लक्ष ठेवून होती. राजश्रीने बाळाची विक्री केल्याचे समजताच तिने पोलिसांना माहिती दिली. राजश्री २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत आहे. तिने तुळजापूरच्या एका दाम्पत्याला बाळ दत्तक देण्याच्या नावावर ५ लाख रुपयांत सौदा केला होता. उर्वरित ४ लाख रुपये १५ दिवसांत देण्याचे ठरले होते. दाम्पत्याला लग्नाच्या ९ वर्षांनंतर मूलबाळ झाले नव्हते. त्यामुळे मुलासाठी ते राजश्रीच्या जाळ्यात अडकले.