बाल स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:02 AM2018-10-15T11:02:08+5:302018-10-15T11:02:42+5:30
उपराजधानीत विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वय लहान असले तरी राष्ट्र व समाजाप्रति असणारी समर्पणभावना, ताल व लयीचे भान ठेवून केलेले संचलन, प्रत्येक हालचालीत शिस्तीचे दर्शन आणि चेहऱ्यावर झळकरणारा प्रखर आत्मविश्वास. उपराजधानीतील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा रविवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला. उपराजधानीत विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
१८ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी रविवारी शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्याचे आयोजन शहरातील पाच विविध मैदानांवर करण्यात आले होते. सर्वच ठिकाणांवर सायंकाळी बाल स्वयंसेवकांनी उपस्थितांसमोर निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझिम, योगासने, कवायती, दंडयोग, नियुद्ध, यांचा प्रामुख्याने समावेश होता.
कार्यक्रमाअगोदर बाल स्वयंसेवकांचे पथसंचलन झाले. यावेळी ठिकठिकाणच्या संघ शाखेचे स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. शहरातील संघ पदाधिकारी व ज्येष्ठ स्वयंसेवकांनीदेखील यावेळी आवर्जून उपस्थित राहून या बालकांचा हुरूप वाढविला.
धरमपेठ, त्रिमूर्तीनगर, सोमलवाडा भाग
धरमपेठ, त्रिमूर्तीनगर व सोमलवाडा भागातील बाल व शिशु स्वयंसेवकांचा उत्सव रविवारी सायंकाळी ५.३० वाजता रामनगर येथील मैदानावर पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. राजीव मोहता, संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, विचार मंच प्रमुख सुनील किटकरु, श्याम पत्तरकिने उपस्थित होते. बाल मनावर मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप या ‘स्क्रीन टाइम’चा दुष्परिणाम जाणवू लागले आहे. त्याचा परिणाम मुलांच्या शरीरावर, मनावर आणि बुद्धीवरही पडतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा स्क्रीन टाईमचे दुष्परिणाम टाळून बालकांचे शरीर, मन आणि बुद्धीचे संवर्धन करीत असल्याचे मत सुनील किटकरू यांनी व्यक्त केले.
लालगंज, बिनाकी, सदर, गिट्टीखदान भाग
लालगंज, बिनाकी, सदर, गिट्टीखदान भागातील बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव शिवाजी मैदान, पोलीस लाईन टाकळी येथे पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ‘वेकोलि’चे ‘सीएमडी’ राजीव रंजन मिश्र हे उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून अयोध्या भाग संघचालक मनोहर सपकाळ होते. याशिवाय विशेष अतिथी ‘अमूल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामसुंदर लड्ढा, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, गिट्टीखदान भाग संघचालक अविनाश बडगे, सहसंघचालक पी. शेखर प्रामुख्याने उपस्थित होते. मनोहर सपकाळ यांनी भारतीय उत्सवांचे आजच्या काळात किती महत्त्व आहे, यावर भाष्य केले. संघ शाखांमध्ये स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. चांगल्या चरित्रांचे निर्माण झाले तर देशाचे चारित्र्य पवित्र होते, असे ते म्हणाले. व्यक्तिगत स्वच्छता ही शरीराला निरोगी ठेवायला मदत करते, देशाला स्वच्छ व सुंदर ठेवायचे असेल तर स्वत:पासून सुरुवात करायला हवी, असा सल्ला श्यामसुंदर लड्ढा यांनी दिला.
इतवारी भाग
मोहिते व इतवारी भागाच्या बाल स्वयंसेवकांच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन गणेशपेठ येथील गाडीखाना मैदानावर करण्यात आले. यावेळी होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.रितेश गोमासे, नागपूर महानगर सहसेवाप्रमुख हरिणारायण येवले, इतवारी भाग संघचालक संजय शिरपूरकर, दक्षिणामुर्ती नगर संघचालक अजय धाक्रस, खदान नगर संघचालक सुनील काबरा आणि गणेशपेठ नगर संघचालक सतीश सारडा हे उपस्थित होते. मेहनत आणि चिकाटी असेल तर काही पण साध्य करणे सोपे जाते. शारीरिक वाढीसाठी शाखेतील मैदानी खेळ मदतीचे ठरतात. मुलांनी डोळ््यासमोर नेहमी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श ठेवावा, असे प्रतिपादन डॉ.गोमासे यांनी केले. समाजातील वंचित लोकांच्या सेवेसाठी लहानपणापासूनच पुढाकार घेणे आवश्यक आहे. समाजालादेखील अशा उपक्रमात जोडले पाहिजे असे आवाहन येवले यांनी केले.