नागपुरात गॅलरीत खेळताना बालकाला विजेचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:36 PM2018-11-14T23:36:35+5:302018-11-14T23:38:57+5:30
घराच्या गॅलरीत खेळत असताना विजेचा धक्का लागून एक सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. बालकाचा डावा हात विजेमुळे भाजला गेला. तसेच, त्याच्या डोक्यालाही मार लागला. बालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घराच्या गॅलरीत खेळत असताना विजेचा धक्का लागून एक सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. बालकाचा डावा हात विजेमुळे भाजला गेला. तसेच, त्याच्या डोक्यालाही मार लागला. बालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास घडली.
तेजस प्रमोद चिखले असे बालकाचे नाव आहे. वेकोलि कॉलनीतील बी-१ क्वॉर्टरच्या गॅलरीत खेळत असताना त्याचा हात विजेच्या मोकळ्या तारेवर पडला. त्यामुळे जोरदार धक्का बसून तो बाजूला फेकला गेला. तेजसचे काका मनोज चिखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बी-२ क्वॉर्टरमधील रहिवासी आनंद आवळे यांच्याकडे १० नोव्हेंबर रोजी लग्न होते. त्यासाठी बी-१ क्वॉर्टरपुढून विजेचे वायर टाकण्यात आले. ते वायर काही ठिकाणी कापलेले होते. त्यामुळे आतील तारा मोकळ्या झाल्या होत्या. यासंदर्भात आवळे यांना सूचना देण्यात आली होती, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. परंतु, आरोपी अद्याप पोलिसांच्या हातात सापडला नाही. पोलीस याविषयी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
आरोपी आहे इलेक्ट्रिशियन
आरोपी हा वेकोलिमध्ये इलेक्ट्रिशियन आहे. आरोपीला तारा मोकळ्या असलेल्या ठिकाणी वायरवर टेपपट्टी लावण्यास सांगण्यात आले होते. परंतु, त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. त्याने निष्काळजीपणा दाखवला.
संबंध चांगले नाही
आरोपी आवळे व चिखले कुटुंबांतील संबंध चांगले नाही. ते गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत बोलत नाहीत. त्यातच ही गंभीर घटना घडली आहे.